मीरा भाईंदर पालिकेच्या 'त्या' अधिकाऱ्यावर कडक कारवाई करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 04:54 PM2020-03-03T16:54:17+5:302020-03-03T16:56:44+5:30

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत मांडला औचित्याचा मुद्दा; परवानगी नसताना शहरात उभारले दोन पुतळे

Take strong action against 'that' officer of Mira Bhayandar Municipality! | मीरा भाईंदर पालिकेच्या 'त्या' अधिकाऱ्यावर कडक कारवाई करा !

मीरा भाईंदर पालिकेच्या 'त्या' अधिकाऱ्यावर कडक कारवाई करा !

Next
ठळक मुद्देराज्य सरकार व गृह विभागाची परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही पुतळे राज्यात उभारले जाऊ शकत नाही.बेकायदेशीर भूमिपूजन व उदघाटनही करून घेतले. राष्ट्रपुरुष , महापुरुष यांचे पुतळे बसविण्यास आमचा कोणताही विरोध नाही.

मीरारोड - राज्य शासनाची कोणतीही परवानगी नसताना वीर महाराणा प्रताप आणि अब्दुल कलाम यांचे पुतळे मीरा भाईंदर महापालिकेच्या बांधकाम विभागाने परवानगीशिवाय पालिकेच्या खर्चातून शहरात बसवले. सरकारच्या धोरणांची पायमल्ली करून परवानगी न घेता हे पुतळे बसवून राष्ट्रपुरुषांचा अपमान केल्याने पालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे आज विधानसभेत केली.

 

राज्य सरकार व गृह विभागाची परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही पुतळे राज्यात उभारले जाऊ शकत नाही. असे असताना राज्य शासनाच्या धोरणाला हरताळ फासून मीरा भाईंदर पालिकेच्या बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी विनापरवानगी परस्पर निविदा प्रक्रिया करून वीर महाराणा प्रताप व अब्दुल कलाम यांचे पुतळे बसवले होते.  विधानसभा निवडणुकीच्या आधी हे पुतळे बसवून ते ताडपत्रीने झाकून ठेवले होते. त्याचे बेकायदेशीर भूमिपूजन व उदघाटनही  करून घेतले. निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन एका पक्षाचा राजकीय फायदा होण्यासाठी एका स्थानिक नेत्याच्या सांगण्यावरून  हे पुतळे बसविण्यात आले असे नागरिकांचे म्हणणे आहे. 

 

या महापुरुषांच्या पुतळ्याची जर काही विटंबना झाली , काही अनुचित घटना घडली तर त्याला जबाबदार कोण ?  असा सवाल सरनाईक यांनी केला. असे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यावर ताबडतोब निलंबनाची कारवाई करावी.  बेकायदेशीरपणे पुतळे बसविणाऱ्या अधिकाऱ्यावर व त्याचे भूमिपूजन - उदघाटन करणाऱ्यावर कडक कारवाई करावी , असे ते म्हणाले.

 

राष्ट्रपुरुष , महापुरुष यांचे पुतळे बसविण्यास आमचा कोणताही विरोध नाही. पण हे पुतळे बसवत असताना सर्व प्रक्रिया पूर्ण  व्हावी , जेणेकरून कोणताही प्रश्न पुढे उद्भवणार नाही असे सरनाईक म्हणाले. या परवानगी नसलेल्या पुतळ्याना , प्रलंबित असलेली रीतसर परवानगी देण्याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली. 

Web Title: Take strong action against 'that' officer of Mira Bhayandar Municipality!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.