गर्दीच्या वेळेत दरवाजा अडवणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई करा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 03:34 PM2019-04-09T15:34:29+5:302019-04-09T15:42:27+5:30

 गर्दीच्या वेळेत लोकलमधील दरवाजे अडवल्याच्या कारणामुळे दिवा स्थानकात गेल्या आठवड्यात प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे रेल रोको केला होता.

Take strong action against the passengers who face the door during a crowded time | गर्दीच्या वेळेत दरवाजा अडवणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई करा

गर्दीच्या वेळेत दरवाजा अडवणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई करा

Next
ठळक मुद्दे गर्दीच्या वेळेत लोकलमधील दरवाजे अडवल्याच्या कारणामुळे दिवा स्थानकात गेल्या आठवड्यात प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे रेल रोको केला होता.दरवाजा अडवणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवासी संघटनांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे केली.डोंबिवली रेल्वे स्थानकातही गेल्या महिन्यात प्रवाशांच्या सुविधांसंदर्भात स्वाक्षरी अभियान घेण्यात आले होते. त्यात ५हजार ५०० प्रवाशांनी सहभाग घेतला होता.

डोंबिवली - गर्दीच्या वेळेत लोकलमधील दरवाजे अडवल्याच्या कारणामुळे दिवा स्थानकात गेल्या आठवड्यात प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे रेल रोको केला होता. पण ती अडचण केवळ दिवा स्थानकातील प्रवाशांची नसून बदलापूर, टिटवाळा, अंबरनाथ, कल्याण,डोंबिवली, मुंब्रा, कळवा आदी स्थानकांमधील प्रवाशांची आहे. त्यासाठी दरवाजा अडवणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रवासी संघटनांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.

मंगळवारी प्रवाशांच्या गैरसोयी, अपेक्षांसंदर्भात समन्वय असावा यासाठी मध्य रेल्वेचे मुख्य वाणिज्य प्रबंधक नरेंद्र पोवार यांच्या दालनात प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी दरवाजा अडवणाऱ्या प्रवाशांसंदर्भात कारवाई करण्यासाठी ठिकठिकाणच्या स्थानकांमध्ये रेल्वे पोलीस दल आणि लोहमार्ग पोलीस यांचे कर्मचारी कार्यरत असतात. प्रवाशांना अडचण आल्यास त्यांनी सुरक्षा यंत्रणेचे सहाय्य मागावे. तसेच जर काही स्थानकात अडचण येत असेल तर तशा सूचना पोलीस यंत्रणेला देण्यात येतील असेही आश्वासन यावेळी देण्यात आले. प्रवाशांनी केलेले आंदोलन हे त्यांच्या गैरसोयीचा उद्रेक होता, त्यामुळे त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करण्यात आली, मात्र ती रास्त नसून त्यासंदर्भात अधिकाऱ्यांनी अधिक भाष्य केले नसल्याचे ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी सांगितले. त्यावेळी त्यांच्यासमवेत मनोहर शेलार, अनिता झोपे, शेखर कापुरे आदींसह अन्य संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

डोंबिवली रेल्वे स्थानकातही गेल्या महिन्यात प्रवाशांच्या सुविधांसंदर्भात स्वाक्षरी अभियान घेण्यात आले होते. त्यात ५हजार ५०० प्रवाशांनी सहभाग घेतला होता. त्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना करून देण्यात आली. त्यातील १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी करण्यात आली. त्यानूसार लोकल फेऱ्या वाढवण्यासाठी १५ डबे उभे राहण्यासाठी फलाटांची लांबी वाढवणे अत्यावश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यासह स्वच्छतागृहांची संख्या वाढवणे, महिलांच्या डब्यासमोर सुरक्षा रक्षकांची गस्त असणे अशा विविध मुद्यांवर चर्चा झाली.

बैठकीनंतर देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी टिटवाळा स्थानकातील पादचारी पूल, अंबरनाथ, बदलापूर स्थानकातील पादचारी पूल यासंदर्भात मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनचे अध्यक्ष रवीशंकर खुराणा यांची भेट घेतली. त्यावर खुराणा यांनी टिटवाळा स्थानकातील कसारा दिशेकडील व मधला पादचारी पूलाचे काम आगामी ६ महिन्यात पूर्ण होणार असून त्यामुळे प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळेल असे सांगितले. पण जागेचा आभाव असल्याने काम संथगतीने सुरू असल्याचे ते म्हणाले. शहाड रेल्वे स्थानकातील फलाटांची रुंदी कमी असून त्यामुळे नव्या पूलांचे लँडींग संदर्भात व अन्य जागेसंदर्भात तांत्रिक अडचण आहे. पण कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांनी सहकार्य केल्यास ती समस्या मार्गी लागेल असे स्पष्ट करण्यात आले. त्यानूसार रेल्वेला सहकार्य करण्यासाठी पालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. अंबरनाथ, बदलापूरच्या होम प्लॅटफॉमचे काम सुरू आहे, पण काहीसा अवधी लागणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले.

Web Title: Take strong action against the passengers who face the door during a crowded time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.