फारकत घेतलेले मेटे पुन्हा भाजपासोबत
By admin | Published: June 16, 2017 02:07 AM2017-06-16T02:07:40+5:302017-06-16T02:07:40+5:30
आघाडीतून युतीत सहभागी झालेल्या पुढे मराठा मोर्चा, शिवस्मारक आणि मंत्रीपदावरून नाराज होत भाजपापासून फारकत घेतलेल्या विनायक मेटे
लोकमत न्यूज नेटवर्क
भार्इंदर : आघाडीतून युतीत सहभागी झालेल्या पुढे मराठा मोर्चा, शिवस्मारक आणि मंत्रीपदावरून नाराज होत भाजपापासून फारकत घेतलेल्या विनायक मेटे यांनी मीरा-भार्इंदर पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला चांगल्या कामाचे प्रशस्तीपत्र दिले आहे आणि भाजपासोबत पालिका निवडणूक लढवण्याची तयारीही दर्शवली आहे.
आमची संग्राम परिषद स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. पण भाजपाने प्रतिसाद दिल्यास त्यांच्यासोबतही लढण्याची तयारी असल्याचे परिषदेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी गुरुवारी मीरा रोडच्या जीसीसी येथील पत्रकार परिषदेत जाहीर केले.
मेटे यांच्या सतत बदलणाऱ्या भूमिकेवर छेडले असता त्यांनी भाजपा चांगले काम करीत आहे. त्यामुळे आम्ही राजकारणासाठी न भांडता समाजकारणाच्या माध्यमातून निवडणूक लढविणार असल्याचे तत्वज्ञान मांडले. या निवडणुकीत भाजपाला शिवसेनेचा पाडाव करता यावा यासाठी शिवसंग्राम परिषदेच्या माध्यमातून मते फोडण्याचा डाव आहे का, असे विचारताच त्यांनी तसे नसल्याचे सांगत प्रश्नाला बगल दिली.
या पत्रकार परिषदेला संग्राम परिषदेचे प्रदेशाध्यक्ष सुबोध मोहिते, शिवसंग्राम परिषदेचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, मुंबई अध्यक्ष दिलीप माने आदी पदाधिकारी उपस्थित होते.
‘नेतृत्त्वहीन ठरल्यानेच मराठा मोर्चे फसले’
आरक्षणाच्या मागणीसाठी काढलेले मराठा क्रांती मोर्चे नेतृत्वहीन ठरल्याने प्रभावी ठरले नाहीत. मात्र भारतीय संग्राम व शिवसंग्राम परिषदेने यासाठी मोठे कार्य केल्याचा मेटे यांचा दावा आहे. धनगर व मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. भाजपाध्यक्ष अमित शहा हे उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याने सेना सत्तेतून बाहेर पडणार नसल्याचा दावा त्यांनी केला.
शेतकऱ्यांना वेतन द्या!
राज्यातील शेतकऱ्यांना दरमहा दोन हजार रुपये वेतन, मोफत आरोग्य सेवा, दैनंदिन कामाच्या हमीचा कायदा आदी मागण्या परिषदेने केल्याचे त्यांनी सांगितले.
कर्जमाफीचा निर्णय स्वागतार्ह आहे. पण सरकारने सत्तेतील सर्व घटक पक्षांशी चर्चा करुन कर्जमाफीचा तपशील जाहीर करावा, अशी पुस्ती त्यांनी जोडली.
सरकारने शेतकऱ्यांना १० हजारांची मदत जाहीर केली असली, तरी ती देण्यात बँका अडवणूक करत आहेत. अशा बँकांवर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.
असा झाला अन्याय...
२०१४ मध्ये पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी आघाडीतून बाहेर पडून मेटे युतीत सामील झाले. भाजपाने विधानसभा निवडणुकीत पाच जागा देण्याचे मान्य केले. त्यातील दोनच जागा दिल्या. त्यात मुंबईतील एका जागेवर परिषदेचा उमेदवार निवडून आला.
तेव्हा भाजपाने मंत्रिमंडळात माझा समावेश करण्यासह महामंडळावरील नियुुक्तीबाबत आश्वासन दिले. मात्र त्यांनी घुमजाव केल्याने माझ्यावर अन्याय झाल्याची खंत मेटे यांनी व्यक्त केली. त्यामुळे संग्राम परिषदेने अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणूक लढवित यश मिळवले.
मीरा-भार्इंदरमध्ये भाजपासोबत निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपाने आश्वासने न पाळल्याबद्दल नाराजी व्यक्त करतानाच मेटे यांनी त्यांच्यासोबत जाण्याचा पवित्रा घेतला. याबाबतची बातमी ‘लोकमत’ने १३ जूनच्या अंकात प्रसिद्ध केली होती.