व्हॉटसॲप ग्रुपमध्ये घेतले अन् ३४.६२ लाखांनी गंडवले
By जितेंद्र कालेकर | Published: July 28, 2024 07:16 PM2024-07-28T19:16:47+5:302024-07-28T19:17:00+5:30
शेअर मार्केटच्या नावाने एकाच आठवड्यात चार गुन्हे
ठाणे : शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून खोपटमधील रवीराज साळुंके (५४) या व्यावसायिकाला ३४ लाख ६२ हजारांचा आॅनलाईन गंडा घालण्यात आला. यासाठी भामट्यांनी साळुंकेला एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी केले होते. या प्रकरणी फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी रविवारी दिली. एकाच आठवड्यात ठाणे शहरात अशा प्रकारे फसवणुकीचे चार प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
साळुंके याला ४ ते १० जुलै २०२४ या कालावाधीमध्ये एका अनोळखी मोबाईलधारकाने व्हॉटसअॅपवर मेसेज करून गोल्डमन सॅक इनव्हेस्टमेंट सेक्यरिटीजच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड केले. याच ग्रुपद्वारे शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या रकमेचा परतावा मिळेल, असे त्याला आमिष दाखवण्यात आले. गुंतवणुकीसाठी भामट्याने साळुंकेकडून ३४ लाख ६२ हजारांची रक्कम ऑनलाईन घेतली.
बरेच दिवस झाले तरी प्रत्यक्षात त्याला कोणताही जादा परतावा किंवा त्यांनी गुंतवलेली मुद्दलची रक्कम दिली नाही. साळुकेने वारंवार पाठपुरावा केला तरी ग्रुपमध्ये कोणीही प्रतिसाद दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने नौपाडा पोलिसांत तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कायदा कलम ३१८ (४) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायदा कलम ६६ (क), ६६ (ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे.