ठाण्यात जन्म दाखल्यासाठी पैसे घेणे शिपायाला पडले महागात, दोन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

By जितेंद्र कालेकर | Published: October 28, 2022 07:54 PM2022-10-28T19:54:25+5:302022-10-28T19:56:29+5:30

उपकार्यालयीन अधिक्षक आणि लिपीक अशा दोन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्यामुळे पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Taking money for birth certificate in Thane becomes expensive for peon show cause notice to two officers | ठाण्यात जन्म दाखल्यासाठी पैसे घेणे शिपायाला पडले महागात, दोन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

ठाण्यात जन्म दाखल्यासाठी पैसे घेणे शिपायाला पडले महागात, दोन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

googlenewsNext

ठाणे: महापालिकेच्या माजिवाडा-मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत येणाऱ्या कावेसर येथील उपकार्यालयामध्ये मुलीचा जन्म दाखला घेण्यासाठी गेलेल्या महिलेकडे पैशांची मागणी करून तिच्याकडून एका शिपायाने पाचशे रुपये घेतले. या महिलेने आपल्यावरील ही आपबिती समाजमाध्यांवर कथन करीत संताप व्यक्त करताच महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी त्याची गांभीर्याने दखल घेऊन त्या शिपायाला निलंबित केले. तसेच उपकार्यालयीन अधिक्षक आणि लिपीक अशा दोन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्यामुळे पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

ठाणे येथील घोडबंदर भागात ही तक्रारदार महिला वास्तव्यला आहे. तिचे पती मुलीचा जन्म दाखला घेण्यासाठी कावेसर येथील कार्यालयामध्ये गेले होते. त्यांनी जन्म दाखल्याच्या दहा प्रतींची मागणी करून त्याप्रमाणे शुल्काचा भारणाही केला. या कार्यालयामध्ये जन्म दाखला देण्याच्या कामाची जबाबदारी एका शिपायावर सोपविलेली आहे. त्याने दाखल्याच्या प्रती देण्यासाठी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावर त्यांनी पैसे कशासाठी द्यायचे ? अशी विचारणा करताच, मुलगी झाल्याच्या खुशीमध्ये पैसे देण्यास सांगितले. अखेर त्याने त्यांच्याकडून पाचशे रुपये घेतले. याबाबतची पतीने माहिती दिल्यानंतर त्या महिलेने समाजमाध्यांवर याबाबत संदेश प्रसारित करून आपला रोष व्यक्त केला. त्याची महापालिका आयुक्त बांगर यांनी दखल घेऊन उपायुक्तांना याप्रकरणी कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी त्या महिलेच्या घरी जाऊन

संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. तेंव्हा या शिपायाने दाखल्यासाठी त्यांच्याकडून पाचशे रुपये घेतल्याची बाब समोर आली. आता या शिपायाला निलंबित केले आहे. तर दोन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली. नागरिकांना सेवा पुरविणे हे महापालिकेचे कर्तव्य असून त्याचबरोबर सेवा घेतल्यानंतर नागरिकांना त्याचा चांगला अनुभव यायला हवा. त्यामुळे असे प्रकार समोर आले तर, संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त बांगर यांनी या घटनेनंतर सर्वच अधिकाऱ्यांना दिल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.
 

Web Title: Taking money for birth certificate in Thane becomes expensive for peon show cause notice to two officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.