जमिनींच्या घोटाळ्याप्रकरणी तलाठ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:46 AM2021-09-15T04:46:47+5:302021-09-15T04:46:47+5:30
मीरा रोड : भाईंदरच्या उत्तन परिसरातील जमिनींच्या घोटाळ्याप्रकरणी उत्तन सागरी पोलिसांनी तलाठी गणेश भुताळे याला अटक केली आहे. उत्तन ...
मीरा रोड : भाईंदरच्या उत्तन परिसरातील जमिनींच्या घोटाळ्याप्रकरणी उत्तन सागरी पोलिसांनी तलाठी गणेश भुताळे याला अटक केली आहे. उत्तन परिसरातील जमिनींची बनावट कागदपत्रे, खोटे वारस दाखवून लुबाडणूक केल्याच्या अनेक तक्रारी आहेत. दोन तक्रारींवर २०१९ मध्ये उत्तन सागरी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे अमीर गफार शेख, तत्कालीन तलाठी गणेश भुताळे व अन्य लोकांवर दाखल झाले होते.
पोलिसांनी या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार अमीर गफार शेख याला यापूर्वीच बेड्या ठोकल्या व गजाआड केले होते. तलाठी भुताळे याने ठाणे न्यायालयाने अंतरिम जामीन नाकारल्यावर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुरुवातीला त्याला तात्पुरता दिलासा मिळाला होता. पण नंतर अंतरिम जामीन रद्द झाला होता. उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत लांगी यांनी भुताळे याला अटक करण्यासाठी त्याचा ठावठिकाणा शोधत महसूल विभागाकडूनही माहिती मागवली होती. अखेर भुताळे याला पोलिसांनी अटक केली. दोन गुन्ह्यांत मिळून पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. मंगळवारी ठाणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. एका गुन्ह्यात २००१ साली जमीन मालक मयत असताना २००९ मध्ये त्याची जमीन दुसऱ्याच्या नावे फेरफार करून फिरवण्यात आली होती. तर दुसऱ्या प्रकरणात जमीन मालकाच्या नावाच्या साधर्म्यचा गैरफायदा घेत अन्य एका कुटुंबीयांनी गैरप्रकार करून जमीन स्वतःच्या नावे करत त्याची विक्री केली होती. या दोन्ही गुन्ह्यांतील मुख्य सूत्रधार अमीर शेख आहे. भुताळे याच्या अटकेने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी यांनी नागरिकांनी त्यांच्या सातबारा वरील नोंदी सातत्याने तपासून पाहिल्या हव्यात. जेणेकरून गैरप्रकार झाल्यास वेळीच लक्षात घेऊन असे घोटाळे रोखता येतील, असे सांगितले.