मतदानाच्या तीन दिवसांच्या ‘ड्राय डे’मुळे तळीरामांची मोठी गोची!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:54 AM2019-04-29T00:54:26+5:302019-04-29T06:16:35+5:30
कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शनिवारी (२७ एप्रिल) सायंकाळी ६ ते रविवारी आणि मतदानाच्या दिवशी म्हणजे सोमवारी (२९ एप्रिल) ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी ‘ड्राय-डे’ घोषित केला आहे.
जितेंद्र कालेकर
ठाणे : कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शनिवारी (२७ एप्रिल) सायंकाळी ६ ते रविवारी आणि मतदानाच्या दिवशी म्हणजे सोमवारी (२९ एप्रिल) ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी ‘ड्राय-डे’ घोषित केला आहे. पण, मुंबईत मात्र सोमवारी सायंकाळी ६ नंतर देशी विदेशी दारूची दुकाने खुली राहणार आहेत. त्यामुळे ठाण्यातील तळीरामांची गोची झाली असून, या तीन दिवसांमध्ये शासनाचाही सुमारे साडेचार कोटींचा, तर मद्य व्यावसायिकांचाही सुमारे १५ कोटींचा व्यवसाय बुडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून दारूचीबेकायदेशीर विक्री आणि निर्मितीला प्रशासनाने आळा घातला. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची पथके त्यासाठी कार्यरत होती. लाखो लीटर दारू आणि रसायन या काळात जप्त करून नष्ट केले. आता परवानाधारक देशी, विदेशी मद्य, बीअर तसेच ताडीच्या घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांना २७ एप्रिलच्या सायंकाळी ६ वाजल्यापासून विक्रीला बंदी केली आहे. त्यानंतर, संपूर्ण ठाणे जिल्ह्यात २८ एप्रिल तसेच मतदानाच्या दिवशी म्हणजे २९ एप्रिल रोजी आणि मतमोजणीच्या दिवशी म्हणजे २३ मे रोजी पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. मुंबईतही याच चार दिवसांमध्ये मद्यविक्रीला बंदी केली आहे. परंतु, तिथे मतदानाच्या दिवशी सायंकाळी ६ पर्यंत ही बंदी आहे. त्यामुळे ठाण्यात जरी त्यादिवशी सायंकाळी ६ नंतर मद्याची दुकाने बंद असली, तरी मुंंबईत ही सोय होणार असल्यामुळे ठाण्यातील तळीरामांची काहीशी पंचाईत होणार आहे.
ठाणे जिल्ह्यात दिवसाला सरासरी एक लाख लीटर दारू रिचवली जाते. त्यापोटी दिवसाचा दीड कोटीचा महसूल गृहीत धरला, तरी तीन दिवसांमध्ये साडेचार कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे. जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार देशी, विदेशी मद्य, ताडी आणि बीअरविक्रेत्यांचाही यात दिवसाचा पाच कोटींप्रमाणे सुमारे १५ कोटींचा व्यवसाय बुडणार आहे. त्यातही मुंबईत जर २९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ नंतर दुकाने खुली राहण्यास अनुमती असेल, तर ठाण्यातही तशी परवानगी मिळण्यासाठी मद्यविक्रेत्यांकडून वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मतदानाची वेळ २९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ पर्यंत आहे. त्यानंतर मतदान अधिकारी मतदानकेंद्रावरून पॅकिंग आणि इतर प्रक्रिया करून मुख्यालयात येईपर्यंत रात्री उशीर होतो. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव २९ एप्रिल रोजी संपूर्ण दिवसभर मद्याची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. - राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे