एसटी कर्मचाऱ्यात दडलेला प्रतिभावान चित्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 11:50 PM2019-09-05T23:50:43+5:302019-09-05T23:51:34+5:30

माझी एसटी, मी एसटीचा

Talented painter hiding in ST staff in mumbai MSRTC | एसटी कर्मचाऱ्यात दडलेला प्रतिभावान चित्रकार

एसटी कर्मचाऱ्यात दडलेला प्रतिभावान चित्रकार

Next

रत्नपाल जाधव   

ही कहाणी आहे संजय आनंदा कारंडे या मनस्वी चित्रकाराची. संजय एसटीच्या ठाणे विभागात कळवा कार्यशाळेत पेंटर म्हणून काम करतो, पण ही झाली त्याची नोकरी. त्याही पलीकडे जाऊन तो एक संवेदनशील चित्रकार आहे. संजयला विविध विषयांवर सामाजिक विषयातील सजावट साकारण्याचे वेड आहे आणि हे वेड जपण्यासाठी तो आपल्या घरातील बाप्पाची सजावट वेगवेगळे विषय घेऊन प्रत्येक वर्षी करत असतो व तेही संपूर्ण इकोफ्रेण्डली, पूर्णपणे पर्यावरणपूरक. त्यासाठी संजयचे अनेक सन्मान झालेले आहेत. संजयच्या घरातील सन्मानचिन्हांनी भरलेले शोकेस पाहिले की, या एसटी कर्मचारी असलेल्या संजयच्या चित्रकलेतील प्रतिभेची जाणीव होते. संजय हा चित्रकार असल्याने कोणत्याही सामाजिक विषयांवरील देखावा तयार करण्यात संजयमधील असलेला चित्रकार विचारही करू लागतो आणि कृतीही.

प्रतिवर्षी संजयकडून होणारी सजावटीच्या विषयाची निवड ही समाजमनाला प्रश्न विचारायला लावणारी असते व त्या अनुषंगाने संपूर्ण देखाव्याची मांडणी केलेली असते. प्रत्येक चित्रकाराची विचार करण्याची एक पद्धत असते व तो चित्रकार त्याच्या पद्धतीने कितीतरी आधीपासून देखाव्याबाबत आखणी करत असतो. तसंच संजयचेही आहे. एकदोन महिने अगोदरपासूनच वेगळ्या विषयाची मांडणी करायची तो सुरुवात करतो व संजयला रंगसंगतीची मुळातच जाण असल्याने त्याला सामाजिक विषयावरील विविध पैलूंना देखाव्यात मांडणं सोपं जातं.
यावर्षीही, असाच एक सामाजिक विषय सजावटीसाठी संजयने मांडला आहे व या विषयाची व्याप्ती पाहता विषय थेट मनाला भिडणारा आहे. विषय आहे पृथ्वीचा ताप... मानवाने आपल्या अघोरी स्वप्नांसाठी जंगल, डोंगर उद्ध्वस्त केले. वृक्षांच्या बेसुमार कत्तली करून मोठमोठे स्वप्नांचे टॉवर उभे केले. सगळीकडे अक्षरश: सिमेंटची जंगलं निर्माण केलेली असल्याने निसर्गाचा समतोल बिघडला. संजय कारंडे यांनी याच विषयावर खूप छान मांडणी केली आहे. त्यात उष्माघाताने त्रस्त एक माणूस आपल्या मोबाइलवरून थेट सूर्याशीच सपर्क करतोय, असं दाखवलं आहे. हा माणूस सूर्यालाच एसएमएस करून त्याचा ब्राइटनेस जरा कमी करणाची विनंती करतोय. त्यावर सूर्यानेही त्याला जे परत उत्तर पाठविले, ते देखाव्यात मार्मिकपणे मांडले आहे. सूर्य माणसाला सांगतोय की, तू तुझ्या मोबाइलच्या सेटिंगमध्ये जा, झाडे लाव, जंगलतोड थांबव, पृथ्वीचा ताप कमी होईल. पृथ्वी थंड झाली की, माझा ब्राइटनेसही आपोआप कमी होईल.

पूर्वी असणारी हिरवीगार जंगले आज कुठे शिल्लक नाहीत. त्याचे परिणाम कधीही पाऊस येतो व कधीही अतिउष्णता होते. निसर्गाच्या ढासळत्या समतोलाचे परिणाम माणूस भोगत आहे, हा एक प्रकारे सजावटकाराने माणसाला दिलेला गर्भित इशाराच आहे. सजावटीतून बाप्पांचा संदेशही अधोरेखित करण्यात आला आहे. मी दगडात नाही, मी देवळात नाही तर मी झाडात आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे... म्हणून वृक्ष तोडू नका हा सामाजिक संदेश देण्याचा खूप चांगला प्रयत्न कारंडे यांनी केला आहे.
संजय कारंडे या चित्रकाराने आपल्या शालेय जीवनात साधारण इयत्ता सहावीपासून रंगाच्या कुंचल्यातून चित्रकलेतील विविध पैलू रेखाटायला सुरुवात केली. घरी चित्रकलेची पार्श्वभूमी नसताना आई कै. बकुळा कारंडे यांनी संजयला चित्रकलेसाठी प्रोत्साहन दिले. संजयने फक्त अभ्यासच करावा, असे वडिलांना वाटत असे. पण, आईने मात्र संजयला चित्रकलेच्या होणाºया सर्व परीक्षा द्यायला लावल्या. पुढे आयटीआयमधून रंगकलेचा कोर्सही संजयने केल्यामुळे १९८८ साली तो एसटीत पेंटर म्हणून नोकरीला लागला. खात्यांतर्गत परीक्षा देत बढतीही घेतली आहे. संपुर्ण एसटी तसेच एसटीवर असणाºया नंबरप्लेट रंगवणे यात संजयचा हातखंडा आहे. संजयला रांगोळ्या काढायची कलाही अवगत आहे. सन २००० साली एसटी प्रवासी संकल्पनेत ठाणे आगार क्र मांक एक येथे संपूर्ण फुलांची रांगोळी संजयने काढली होती. रांगोळीच्या मधोमध एसटीचा प्रदर्शनी भाग काढला होता व बाजूला विविध समाजघटकांना एसटीकडून मिळणाºया सवलती रांगोळीतून दाखवण्यात आल्या होत्या. दोन दिवस एक रात्र एवढी मेहनत या रांगोळीसाठी संजयने घेतली होती. कार्यक्रमासाठी उपस्थित तत्कालीन एमडी उज्ज्वल उके यांनी संजयचं त्यासाठी खास कौतुकही केलं होतं. सजावटीच्या कामात त्यांना पत्नी मनीषा व मुलगी भाग्यश्री मदत करतात.

यापूर्वी देशभक्तीपर कारगिल युद्ध, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा, स्त्रीभ्रूणहत्या, बेटी बचाव (लेक माझी लाडकी), बालमजुरी, शिक्षण, जल हे जीवन (पाणी वाचवा), सर्वात मोठे दान, रक्तदान : असे अनेक समाजमनाला अंतर्मुख करायला लावणारे विषय संजय कारंडे यांनी देखाव्यात मांडलेले आहेत. यावर्षी झाडे वाचवा... झाडे लावा हा सजावटीचा विषय असल्याने घरी बाप्पाच्या दर्शनासाठी येणाºया प्रत्येकाला तुळशीचे रोप देऊन वृक्षलागवडीचा संदेश देण्यात येत आहे.

संजय कारंडे एसटीच्या ठाणे विभागात कळवा कार्यशाळेत पेंटर म्हणून कार्यरत आहे, पण त्यांच्यातील चित्रकार त्यांना स्वस्थ बसू देत नाही. गणेशोत्सवादरम्यान समाजमनाला थेट भिडणारे विषय देखाव्यासाठी सुचवणे, त्यांच्या सजावटीसाठी काम करणे आणि ती सजावट पर्यावरणपूरक करणे, हे संजय यांचे वैशिष्ट्य. माणूस स्वत:च्या स्वप्नांसाठी पर्यावरणाचा जो ºहास करत आहे, त्या अनुषंगाने सूर्य आणि माणसाचा संवाद यंदाच्या देखाव्यातून त्यांनी मांडला आहे. यापूर्वीही त्यांनी साकारलेल्या देखाव्यांना विविध सन्मान प्राप्त झालेले आहे. पर्यावरणाचे भान, हीच उत्सवाची शान हा संदेश आपल्या कलेतून देणाºया एसटी कर्मचाºयात दडलेल्या प्रतिभावान चित्रकाराला सलाम.

संपूर्ण एसटी तसेच एसटीवर असणाºया नंबरप्लेट रंगवणे यात संजयचा हातखंडा आहे. ठाणे विभागातर्फे तयार करण्यात येणाºया प्रत्येक चित्ररथाचे रंगकाम संजयने प्रभावीपणे केलेले आहे. तसेच दरवर्षी एसटीच्या होणाºया आंतरविभागीय नाट्यस्पर्धेत ठाणे विभागातर्फे सादर होणाºया नाटकाच्या नेपथ्यात रंग भरण्याचे काम त्यांनी केले आहे व त्यासाठी संजयला नेपथ्यकार म्हणून बक्षिसेही मिळालेली आहेत. सन २००० सालचा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा कामगार क्षेत्रातील मानाचा गुणवंत कामगार पुरस्कार संजयला मिळालेला आहे.

Web Title: Talented painter hiding in ST staff in mumbai MSRTC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.