सहा सोनेरी पानांचा इतिहास मुलांना सांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 01:03 AM2018-05-30T01:03:28+5:302018-05-30T01:03:28+5:30
सावरकरांनी लिहिलेले ‘सहा सोनेरी पाने’ हे पुस्तक म्हणजे हिंदूंच्या दिग्विजयाचा इतिहास आहे.
ठाणे : सावरकरांनी लिहिलेले ‘सहा सोनेरी पाने’ हे पुस्तक म्हणजे हिंदूंच्या दिग्विजयाचा इतिहास आहे. इ.स. पूर्व कालखंडापासून ते स्वातंत्र्य मिळेपर्यंत या काळातील सहा महत्त्वाच्या लढाया आणि त्यात हिंदूंनी मिळवलेल्या विजयाची गाथा त्यात आहे. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात पाठ्यपुस्तक असावे, असे हे पुस्तक आहे. त्याचा अभ्यासक्रमात कधी समावेश करेल तेव्हा करू दे, मात्र तोपर्यंत आपण हे पुस्तक आणि त्यातील इतिहास मुलांना उलगडून सांगितला पाहिजे, असे मत गीता उपासनी यांनी व्यक्त केले.
स्वा. वि.दा. सावरकर प्रतिष्ठानतर्फे सावरकर जयंतीनिमित्त पुरस्कार प्रदान सोहळा आणि व्याख्यानाचा कार्यक्रम सोमवारी मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात पार पडला. त्यावेळी स्वा. सावरकरांच्या सहा सोनेरी पाने या पुस्तकावर उपासनी यांनी व्याख्यान दिले. सहा सोनेरी पाने या पुस्तकातील पहिली चार सोनेरी पाने अर्थात चार मोठे विजय म्हणजे सावरकरांच्या भाषेत तो भारताचा प्राचीन इतिहास आहे. उर्वरित दोन सोनेरी पाने म्हणजे मुघल आणि इंग्रजांवर मिळवलेला विजय हा अर्वाचीन इतिहास आहे आणि या दोन विजयांबद्दल सविस्तर माहिती आहे, असे उपासनी म्हणाल्या. तर, पहिल्या चार लढायांमध्ये आपण राजकीय विजयाबरोबरच सांस्कृतिक, धार्मिक विजयही मिळवलेला आहे. मात्र, उर्वरित शेवटच्या दोन सोनेरी पानांना धार्मिक पराभवाची दुर्गंधी आहे. त्यातही पाश्चिमात्य आक्रमणांवर विजय मिळवतामिळवता आपल्या देशाचे दोन तुकडे झाले, इतकी धार्मिक अस्थिरता त्यावेळी होती, असे मत गीता उपासनी यांनी मांडले.
पूर्वार्धात सावरकर स्मृती पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. टीजेएसबीचे सीईओ सुनील साठे हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. सांस्कृतिक क्षेत्रासाठी ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ, शिक्षण क्षेत्रासाठी वीणा भाटिया, व्यवसाय क्षेत्रासाठी उल्हास प्रधान, कार्यक्षम नगरसेवक म्हणून दिलीप बारटक्के, समाजसेवक म्हणून बाळकृष्ण नातू, पत्रकारिता क्षेत्रासाठी मंगेश विश्वासराव यांना सन्मानित केले.
हिंदुत्व हा सावरकरांचा ध्यास : ‘मला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले, मात्र सावरकरांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी सर्वोच्च आहे. सावरकरांचे विश्व खूप मोठे आहे आणि इतक्या मोठ्या व्यक्तीच्या नावे आम्हाला पुरस्कार मिळाला, हे आमचे भाग्य आहे’, अशा शब्दांत समेळ यांनी पुरस्काराला उत्तर दिले. हिंदुत्व हा सावरकरांचा ध्यास होता. त्यामुळे या राष्टÑात आपण हिंदूंनी एकत्र येऊन हिंदुत्व जपले पाहिजे, असेही ते म्हणाले. यावेळी ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन, संस्थेचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर, दुर्गेश आकेरकर आदी उपस्थित होते.