टीव्हीवर होणाऱ्या चर्चा म्हणजे असतो मनोरंजनाचा खेळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 06:41 AM2018-05-21T06:41:26+5:302018-05-21T06:41:26+5:30
सध्याच्या प्रसारमाध्यमांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वेगवेगळी बंधने येत आहेत.
ठाणे : तंत्रज्ञानामुळे आपण समाजापासून तुटत चाललो आहोत. माध्यमांमुळे आपण समाजाशी जोडलेलो आहोत, असे आपल्याला वाटत असले तरी ते खरे नाही. प्रसारमाध्यमेही कोणत्या बातमीला कसा रंग द्यायचा, हे अगोदरच ठरवतात. त्यामुळे टीव्हीवर होणाºया चर्चा हाही मनोरंजनाचा खेळ असतो, अशी परखड टीका ज्येष्ठ पत्रकार आणि काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी केली.
‘वुई नीड यू सोसायटी’तर्फे ‘प्रसार माध्यमे आणि लोकशाहीचे भवितव्य’ या विषयावर शनिवारी टाऊन हॉलमध्ये परिसंवाद झाला. त्यात ते बोलत होते. सध्याच्या प्रसारमाध्यमांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वेगवेगळी बंधने येत आहेत. ती कधी व्यवसायाशी संबंधित असतात, त्यातून कधी मालकांची, कधी सरकारची, कधी लोकसंघटनांची, तर कधी विचारसरणीही असतात. ते लक्षात घेता आपण वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य बºयापैकी टिकवू शकलो आहोत. याचे स्वागत केले पाहिजे. पण टीव्ही म्हणजेच इलेक्ट्रॉनिक माध्यमावर मुख्यत: सरकारी जाहिरातींचा दबाव आहे. लोकशाहीतही प्रसारमाध्यमांवर प्रचंड दडपण असते. मोकळेपणाने विचार मांडता नाही. अनेकदा ही बंधने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या पत्रकारांवपर्यंत पोचवली जातात. यात विचारसरणी हाही महत्त्वाचा भाग आहे. आता जवळपास ६० ते ७० टक्के पत्रकारांची विचारसरणी अत्यंत प्रतिगामी, सनातनी आहे. त्यांनी डावे असावे, असे नाही; परंतु त्यांनी खुले असावे. तो खुलेपणा ७० टक्के पत्रकारांमध्ये नाही, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
माध्यमांवरचा दबाव फार सफाईने वाढत आहे. समजा, सिरियातील घडामोडींचे रिपोर्टिंग पाहिले, तर ते एम्बेडेड जर्नालिस्टने (माहितीचे हवे तसे रोपण करणाºया पत्रकारांनी) तयार केलेले प्रस्थापितांचे वार्तांकन (एस्टाब्लिशमेंट रिपोर्टिंग) असल्याचे दिसते. तेथे प्रत्यक्ष रिपोर्टिंग होतच नाही किंवा तसे चित्र येत नाही. माहितीचे हवे तसे रोपण केलेले दिसते. तशीच पद्धत सध्याच्या राजकारण्यांनी विकत घेतल्याची टीकाही त्यांनी केली. अशा स्थितीत सर्व चॅनेलपैकी ६७ टक्के चॅनेलची मालकी असलेल्या रिलायन्सचीही या सत्ताधाºयांना गरज नाही. एम्बेडेड जर्नालिझममुळे टीव्हीवरील बातम्या, चर्चा पाहण्यातही अर्थ नाही, असे मत केतकर यांनी मांडले. पण सध्याची पत्रकारिता पोखरली जात आहे आणि तिला काही प्रमाणात सध्याची राजकीय व्यवस्था जबाबदार आहे, असा ठपका त्यांनी ठेवला.
पत्रकार दीप्ती राऊत म्हणाल्या, की पत्रकारांना, वार्ताहरांना आता चुकीचे काही दिसतच नाही. जे काम सरकारचे जनसंपर्क कार्यालय करते ते काम आपले असल्याचे पत्रकारांना वाटते. पत्रकारांचे काम विरोधी पक्षाचे आहे, हे जनता, सत्ताधारीच नव्हे, तर पत्रकारही विसरले आहेत आणि हा लोकशाहीला धोका आहे. सर्व वार्ताहर, डेस्कवरची मंडळी, माध्यम संस्थांमध्ये नेतृत्त्व करणारी मंडळी ही भक्त बनली आहेत. बातमीची विश्वासार्हता, सत्यता जी आजवर पत्रकारांशी जोडलेली होती, ती सोशल मीडियामुळे पूर्ण ढासळली आहे. प्रत्यक्ष घटनेच्या ठिकाणी जाऊन वार्तांकन करण्याचे प्रमाण कमी होत आहे, असे मत त्यांनी मांडले.
परिसंवादाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. गोपाळ गुरू म्हणाले की, वृत्तपत्र आणि लोकशाहीला असलेले सामाजिक भान यात अंतर पडत आहे. होर्डिंग इक्वॅलिटीमागचे वास्तव मीडिया दाखवत नाही. प्रत्येकजण आज हुकुमशाहीचा मार्ग अवलंबत आहे. काय चुकीचे, काय खरे हे पत्रकारांना दिसत नाही. वर्तमानपत्र स्वबळावर उभे असेल, तर दबावापासून वेगळे राहता येते. त्यामुळे लोकशाहीसोबत असलेली माध्यमे ही जगवली पाहिजेत. अनेकदा टीव्हीवर दृश्ये दाखवताना वास्तव लपविले जाते. लोकांमध्ये अन्यायाविरुद्ध जाणीवा निर्माण करण्यासाठी टीव्ही माध्यमांचा उपयोग होतो. अशा संदर्भात ट्रॅजेडी ही जाणीवांची गरज बनते, ट्रॅजेडीशिवाय तुमच्यात जाणीवा निर्माण होऊ शकत नाही, असे मत डॉ. गुरू यांनी मांडले.