ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर रंगला "हम तो तेरे आशिक हैं" चा परिसंवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 03:26 PM2018-05-07T15:26:31+5:302018-05-07T15:26:31+5:30
ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर "हम तो तेरे आशिक हैं" या नाटकाचा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.
ठाणे : रविवारी ३७५ क्रमांकाच्या अभिनय कट्ट्यावर "हम तो तेरे आशिक हैं" या १० मे रोजी रसिकांसमोर येत असलेल्या नाटकाच्या निमित्ताने या नाटकाच्या टिमबरोबर परिसंवाद रंगला. कट्ट्याच्या सुरुवातीला ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते, "मोरूची मावशी" या नाटकाचे दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर तसेच कट्ट्याचा कलाकार वैभव जाधव याचे वडिल यांना अभिनय कट्ट्यातर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर "हम तो तेरे आशिक हैं" च्या संचाकडून दिपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी सादरीकरण करताना शुभांगी गजरे हिने ती फुलराणी नाटकातील "तुला शिकवीन चांगलाच धडा" हा प्रवेश सादर केला तर सई कदम हिने "शांतता कोर्ट चालू आहे" यामधील बेणारे बाई साकारल्या. सहदेव साळकर आणि स्वप्नील माने यांनी " राम राम गंगाराम" ही द्विपात्री सादर केली. "शोध कलाकारांचा" या नवीन उपक्रमाअंतर्गत धनंजय कुरलेकर यांनी "आत्महत्या" ही एकपात्री तर मनीषा शीतूत यांनी "नटसम्राट" मधील एक प्रवेश सादर केला. राजसी हिने "रखुमाई" गाणं सादर केल. यानंतर संकेत देशपांडे, प्राची मंचेकर व सुमुख जोशी या कलाकारांनी "हम तो तेरे आशिक हैं" या १० मे रोजी रंगमंचावर येणाऱ्या संजय मोने लिखित नाटकातील एक छोटासा प्रवेश सादर केला. या रंगतदार प्रवेशानंतर त्याला जोडूनच अभिनय कट्ट्याचे अध्यक्ष व सिंड्रेला चित्रपटाचे दिग्दर्शक किरण नाकती यांनी या कलाकारांना परिसंवादाच्या माध्यमातून बोलते केले. या नाटकामध्ये सुत्रधाराची भूमिका करत असलेला संकेत देशपांडे, रुक्सानाची भूमिका करत असलेली प्राची मंचेकर व अनिलची भूमिका साकारत असलेला तसेच निर्मिती आणि दिग्दर्शन या जबाबदाऱ्याही सांभाळत असलेला सुमुख जोशी या कलाकारांनी या परिसंवादात भाग घेतला. त्याचबरोबर नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळत असलेली प्रविणा मंचेकर व संगीत सहाय्य करत असलेला वैभव शेटे यांनीही प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना संकेत देशपांडे याने या नाटकाचे भाषा, संवाद, आशय तसेच यामुळे प्रेक्षकांमधील प्रत्येकाबरोबर या नाटकाचे जुळत जाणारे नाते असे पैलू उलगडून सांगितले. ही भूमिका साकारताना कमी वेळ असतानाही पकड घेणे कसे जमले हे सांगताना संकेतने याचे श्रेय संपूर्णपणे अभिनय कट्ट्याने गेली ७ वर्ष जी कार्यपद्धती अनुसरली आहे, त्याला दिले. प्राची मंचेकर हिने रुक्साना साकारताना आलेला अनुभव, त्यातली गंमत प्रेक्षकांसमोर मांडली. अभिनयाबरोबरच निर्मिती व दिग्दर्शनाची धुरा सांभाळत असलेल्या सुमुख जोशीने हेच नाटक निवडण्याचे कारण, संजय मोने यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखक- कलाकाराच्या लेखणीतून उतरलेली व संजय मोने, मुक्ता बर्वे, जितेंद्र जोशी या दिग्गज कलाकारांनी काम केलेली कलाकृती साकारताना आलेले दडपण, प्रेक्षकांना काही चांगले देण्याचा निर्माता आणि कलाकार म्हणून असलेला हेतू, अशा अनेक मुद्द्यांवर संवाद साधला. अभिनय कट्ट्याचे कलाकार असलेल्या या तिनही कलाकारांनी या नाटकातील व्यक्तिरेखा साकारत असताना अभिनय कट्ट्यावर केलेले काम, अभ्यास याचा भरपूर उपयोग झाल्याचे यावेळी आवर्जून सांगितले. नृत्यदिग्दर्शन करत असलेली प्रविणा मंचेकर हिने यातील गाण्यांचे वैशिष्ट्य, नृत्याचे महत्व व नृत्यदिग्दर्शन करत असताना झालेल्या गंमती हे अनुभव प्रेक्षकांसमोर मांडले तर वैभव शेटे याने संगीत सहाय्य करतानाचे अनुभव मांडले. यावेळी बोलताना अभिनय कट्ट्याचे अध्यक्ष व सिंड्रेला चित्रपटाचे दिग्दर्शक किरण नाकती यांनी यातील प्रत्येक कलाकाराचे वैशिष्ट्य प्रेक्षकांसमोर उलगडून सांगितले. "हम तो तेरे आशिक हैं" हे नाटक म्हणजे प्रत्येक घरातली आणि घरातल्या प्रत्येकाची गोष्ट आहे, ही भावनांची गोष्ट आहे असे मत व्यक्त करतानाच एक चांगली कलाकृती आपल्यासमोर घेउन येण्याची प्रामाणिक धडपड हे रंगकर्मी करत असताना आपण कलाकार आणि रसिक प्रेक्षक म्हणून त्यांच्याबरोबर ठामपणे उभे राहत या कलाकृतीला प्रतिसाद देण्याची गरज आहे असे आवाहनसुद्धा किरण नाकती यांनी केले. या आवाहनाला उपस्थित प्रेक्षकवर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या संपुर्ण कट्ट्याचे सुत्र संचालन आदित्य नाकती याने केले.