बोलण्यात गुुंतवत ५१ हजारांचे मोबाइल लांबवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:49 AM2018-02-21T00:49:41+5:302018-02-21T00:49:46+5:30
कल्याणच्या कारचालकाला धक्का लागल्याची बतावणी करून बोलण्यात गुुंतवून त्याच्याकडून ५१ हजारचे दोन मोबाइल लुबाडल्याचा प्रकार सोमवारी माजीवडा पुलाजवळ घडला
ठाणे : कल्याणच्या कारचालकाला धक्का लागल्याची बतावणी करून बोलण्यात गुुंतवून त्याच्याकडून ५१ हजारचे दोन मोबाइल लुबाडल्याचा प्रकार सोमवारी माजीवडा पुलाजवळ घडला. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण पूर्व भागातील चिंचपाडा येथील रहिवासी सुशील सिंह हे १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी कल्याण येथून मुंबई नाशिक हायवे मार्गाने मुलूंड येथे पत्नी आणि मुलाला घेण्यासाठी जात होते. सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ते माजीवडा पुलाच्या बाजूला असलेल्या सिग्नलवर थांबले असता, अचानक त्यांच्या कारच्या डाव्या बाजूला पुढील दरवाजाजवळ एक भामटा आला. त्याने शिवीगाळ करून दरवाजाची काच त्यांना खाली घेण्यास भाग पाडले. नंतर ‘कोणत्या धुंदीत गाडी चालविता, तुमच्यामुळे एक व्यक्ती गाडीखाली आली असती’, असे सांगून त्यांना बोलण्यात गुंतविले. त्यानंतर दुसºया बाजूने आलेल्या व्यक्तिनेही त्यांना शिवीगाळ करून दरवाजाची काच खाली करण्यास भाग पाडले. त्याचवेळी डाव्या बाजूला असलेल्या व्यक्तीने पुन्हा शिवीगाळ करून त्यांचे लक्ष विचलित करून तिथून पळ काढला. यामुळे प्रचंड भेदरलेल्या सिंह यांनी पोलिसांना कळवण्यासाठी मोबाइल शोधले. तेव्हा त्यांचे ५१ हजारांचे दोन्ही मोबाइल गायब झाले होते. या दोघांविरुद्ध त्यांनी कापूरबावडी ठाण्यात फसवणूक आणि शिवीगाळीची तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक एस. ए. देशमुख तपास करीत आहेत.