भिवंडीत गावठी दारू हातभट्ट्यांवर तालुका पोलिसांची कारवाई
By नितीन पंडित | Published: March 3, 2023 05:07 PM2023-03-03T17:07:35+5:302023-03-03T17:09:55+5:30
वडूनवघर गावच्या हद्दीतील फिरींगपाडा खाडी किनारी झाडा झुडपात असलेल्या दोन गावठी दारू हातभट्ट्यांवर कारवाई करीत सुमारे १५० लिटर गावठी दारुसह काळा गूळ, नवसागर व इतर रसायन असा १ लाख ९५ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल तालुका पोलिसांनी नष्ट केला आहे.
भिवंडी - गावठी दारू विक्री बंदी असतानाही भिवंडीतील ग्रामीण भागात गावठी हातभट्टी दारू मोठ्या प्रमाणात बनवली जात असल्याची गुप्त माहिती तालुका पोलिसांना मिळतात भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे व सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने गुरुवारी वडूनवघर गावच्या हद्दीतील फिरींगपाडा खाडी किनारी झाडा झुडपात असलेल्या दोन गावठी दारू हातभट्ट्यांवर कारवाई करीत सुमारे १५० लिटर गावठी दारुसह काळा गूळ, नवसागर व इतर रसायन असा १ लाख ९५ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल तालुका पोलिसांनी नष्ट केला आहे.
वडू नवघर फिरिंग पाडा खाडी किनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणात गावठी दारूच्या भट्ट्या लावण्यात येत असतात या हातभट्ट्यांची खबर भिवंडी तालुका पोलिसांना मिळाली होती गुरुवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी आपले सहकारी पोलीस हवालदार आंभुरे ,पो हवालदार कोळी ,पोलीस नाईक मोरे,पोलीस नाईक दामू पवार ,पोलीस शिपाई भामरे, पवार यांना सोबत घेऊन दोन्ही गावठी दारू हातभट्ट्या उध्वस्त करत दोन्ही ठिकाणाहून सुमारे ७० ड्रम गावठी दारूचे रसायन नष्ट केले.
या हातभट्ट्या खाडीकिनारी झाडाझुडपात असल्याने तालुका पोलिसांनी गुडघाभर चिखलातून प्रवास करून या गावठी हातभट्ट्यांवर कारवाई केली. या कारवाईदरम्यान सहाय्य पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांनी दिली आहे.