ठाणे पुर्वेत तांबट पक्ष्याला मिळालं जीवदान
By अजित मांडके | Published: April 26, 2024 04:15 PM2024-04-26T16:15:30+5:302024-04-26T16:15:58+5:30
मुंबईचा पक्षी अशी ओळख असणारा तांबट पक्षी वर्षभर आपल्या परिसरात असून देखील तो दिसत नाही. परंतु आताच्या पान गळती हंगाम असल्यामुळे त्याचे दर्शन घडत आहे
ठाणे : ठाणे शहरात तापमानाचा पारा वाढत असताना याची झळ पक्ष्यांना बसू लागली आहे. ठाणे पूर्व पोस्ट ऑफिस जवळ निपचित पडलेल्या एका तांबट पक्ष्याला महापालिका कर्मचारी आणि पक्षीमित्र भरत मोरे यांनी जीवदान दिले आहे. पक्ष्यांची योग्य सुश्रुषा करून त्याच्या अधिवासात सोडले आहे.
मुंबईचा पक्षी अशी ओळख असणारा तांबट पक्षी वर्षभर आपल्या परिसरात असून देखील तो दिसत नाही. परंतु आताच्या पान गळती हंगाम असल्यामुळे त्याचे दर्शन घडत आहे. अशातच ठाणे पूर्व मीठ बंदर रोड पोस्ट ऑफिस जवळ, वाढत्या उष्म्याने हैराण झालेल्या तांबट पक्षी पडलेला आढळून आला. या पक्ष्यावर भूतदया दाखवत पोस्टमन अक्षय वाळके यांनी सामाजिक कार्यकर्ते आनंद कोळी यांच्याशी संपर्क साधला. आनंद यांनी ही माहिती महापालिका कर्मचारी आणि पक्षीमित्र भरत मोरे यांना सांगितले. दरम्यान तांबट पक्ष्याला भरत यांनी पाणी पाजून तात्काळ सुश्रुषा केली. थोडा वेळात तांबट पक्ष्याला ताजतावन वाटल्यावर तांबट पक्ष्याला अधिवासात सोडले.
तांबट पक्ष्याचे तीन प्रकार असून कॉपर स्मिथ बारबेट, तपकिरी डोक्याचा तांबट (ब्राऊन हेडड बारबेट) आणि पांढ-या गालाचा तांबट (व्हाईट चिक बारबेट) असे प्रकार आढळून येतात. यापैकी कॉपर स्मिथ बारबेट मुंबई ठाणे शहरात सर्वत्र आढळतो, तर तपकिरी डोक्याचा तांबट हा संजय गांधी राष्ट्रिय उद्यान तर पांढ-या गालाचा तांबट हा पश्चिम घाटात दिसतो. आपल्याकडे दिसणारा तांबट पक्ष्याला रसाळ फळ खायला भरपूर आव़डत असून काहीवेळा छोटे किटकावर ताव मारतो. एरवी गर्द झाडांमध्ये लपून बसलेला असतो, परंतु सध्या पानगळतीचा हंगाम असल्याने हा पक्षी वड, पिंपळ, उंबर, जांभूळ अशा झाडांवर बसलेला दिसतात.
मंदार बापट (पक्षी अभ्यासक)