ठामपाने सहा महिन्यांत केल्या २.२१ लाख कोरोना चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 12:20 AM2020-09-23T00:20:09+5:302020-09-23T00:20:23+5:30
एकूण रुग्ण ३२ हजार : रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६ टक्के
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे महापालिकेने शहराच्या विविध भागांत सुरू केलेल्या कोरोना चाचणी केंद्रांत गेल्या सहा महिन्यांत दोन लाख २१ हजार चाचण्या केल्या असून, त्यातील केवळ ३२ हजार ८२ जणांना त्याची लागण झाल्याचे निदान झाले आणि ९३० जणांचा मृत्यू झाला. शहरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८६ टक्के असल्याने इतर शहरांच्या मानाने ठाणे शहरातील कोरोना नियंत्रणात असल्याचे दिसत आहे.
ठाणे शहरात मार्च महिन्यात पहिला रु ग्ण आढळला होता. वेळीच कठोर उपाययोजना न आखल्याने शहरात दिवसागणिक कोरोनाबाधितांसह मृत्यूंच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत होते. यावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त व सर्व अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केली होती. तसेच शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना आखण्याच्या सूचना केल्या होत्या. याची गांभीर्याने दाखल घेऊन ठाणे महापालिकेने मोठ्या प्रमाणात चाचण्या वाढविल्या आहेत. यामुळे नवे रु ग्ण आढळण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी, गेल्या सहा महिन्यांपासून ठाणे महानगरपालिका कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. सद्य:स्थितीत ठाणे महानगरपालिका घरोघरी जाऊन लोकांच्या चाचण्या करण्यावर भर देत आहे. ठिकठिकाणी आरोग्य शिबिरे राबवित आहेत. अॅण्टिजन चाचणीवर भर दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानाला ठाणे महानगरपालिकेने जोमाने सुरु वात केली आहे. परिणामी, सद्य:स्थितीला रोज सुमारे पाच ते सहा हजार नागरिकांची कोविड चाचणी केली जात आहे. अॅण्टिजन आणि स्वॅब चाचण्या केल्या जात आहेत. त्यातील सरासरी ३०० ते ४०० नागरिक हे पॉझिटिव्ह आढळत आहेत. तर उपचारासाठी दाखल झालेले सरासरी ८६ टक्के रु ग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.