टँकरचीही होतेय पळवापळवी
By admin | Published: April 7, 2016 01:17 AM2016-04-07T01:17:51+5:302016-04-07T01:17:51+5:30
कल्याण-डोंबिवलीतील पाणीप्रश्न तीव्र होत असतानाच सोसायट्यांनी पैसे भरून बुक केलेले टँकरही गायब होऊ लागल्याने पाण्याचा काळाबाजार सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे
मुरलीधर भवार, कल्याण
उल्हासनगरपाठोपाठ कल्याण-डोंबिवलीतील पाणीप्रश्न तीव्र होत असतानाच सोसायट्यांनी पैसे भरून बुक केलेले टँकरही गायब होऊ लागल्याने पाण्याचा काळाबाजार सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. संख्या तिप्पट करूनही टँकरची पळवापळवी सुरू असल्याने वेटिंग लिस्ट सतत वाढते आहे.
वेळेत आणि पुरेसे पाणी मिळत नसल्याने बाटलीबंद पाण्याची मागणी वाढली आहे. त्यांचे दरही अचानक वाढले आहेत. प्रसंगी तोटा सोसून महापालिका टंचाईग्रस्त भागाला माफक दरात टँकरद्वारे पाणी पुरवते. डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगरमधील जय त्रिरूप सोसायटीने फेब्रुवारीत पैसे भरून बुक केलेल्या चार टँकरपैकी अवघे दोनच टँकर त्यांना मिळाले. त्यापैकी दोनच टँकर सोसायटीने पाठपुरावा केल्यावर दिले गेले. उर्वरित दोन टँकर अद्याप सोसायटीला पुरविले गेलेले नाही. हे पाणी कोणी पळवले, असा सवाल सोसायटीचे सचिव रवींद्र नेहरकर यांनी केला.
याबाबत, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा म्हणाले, सोसायटीने पाठपुरावा केला नसेल, तर त्यांना टँकर मिळाला नसेल. मागणी जास्त आहे म्हणून एकाचा टँकर दुसऱ्याला दिला जात नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
टँकर वाढणार
३० टक्के पाणीकपातीनंतर खाजगी कंत्राटदारांचे १५ टँकर लावण्यात आले होते. पालिका खाजगी कंत्राटदाराला पाच फेऱ्यांचे दोन हजार ३४० रुपये मोजते. पण, नागरिकांकडून एका टँकरचे ३२० रुपये घेतले जातात. टंचाई भीषण झाल्याने आणखी १५ टँकर वाढवण्यात आले आहेत. तेही कमी पडून लागल्याने १५ टँकर वाढवले जाणार आहेत.
>पाण्याचा काळाबाजार : भार्इंदर : शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सरकारकडून अतिरिक्त पाणीपुरवठा होत आहे. परंतु, या अतिरिक्त पाण्याचा पालिकेच्या कंत्राटावर असलेले टँकरवाले नागरिकांच्या वाट्याचे पाणी काळ्याबाजारात खाजगी टँकरवाल्यांना खुलेआम विक्री करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. यापूर्वीही पाणीटंचाईची झळ शहराला बसली असतानाच वरसावे येथील जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधील गळतीचा गैरफायदा घेणाऱ्या पाणीमाफियांची चोरी उघड झाली होती.
> पाण्याच्या दोनच तक्रारी
ठाणे : पाण्यासंदर्भातील अडचणी किंवा तक्रारींबाबत ठाणे जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी सुरू केलेल्या १०७७ या टोल फ्री क्रमांकावर पहिल्याच दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत दोनच तक्रारी आल्या. यामध्ये ठाणे शहरातून एक तर दुसरी नवी मुंबईतून आली आहे. सर्वत्र पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच, ठाणे जिल्ह्यातील विविध जलसाठ्यांतील पाणीसाठा हा अत्यल्प आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांत वेगळ्या स्वरूपात पाणीकपात करण्यास सुरुवात केली आहे.