आमदारांच्या गावातच टँकर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 02:33 AM2019-04-23T02:33:36+5:302019-04-23T02:33:58+5:30
जलुबाईची विहीर आटली; आश्रमशाळेला सुटी असल्याने मुलांची त्रासातून सुटका
- जनार्दन भेरे
भातसानगर : शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई दोन महिन्यांपासून दिवसेंदिवस तीव्र होते आहे. येथील १४२ गावपाड्यांत टंचाईच्या झळा बसत असून या गावांमध्ये आमदारांच्या गावाचाही समावेश आहे.
पेंढरघोळ हे तालुक्याचे आ. पांडुरंग बरोरा यांचे गाव. या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी वनविभागाच्या वतीने पाणीयोजना राबवण्यात आली आहे. कधीही न आटणाऱ्या जलुबाई या विहिरीवरून पाणीयोजना तयार करण्यात येऊन अनेक वर्षांपासून येथे पाणीपुरवठा केला जातो. तीन पाडे जवळजवळ असल्याने त्यांनादेखील पाण्याचा प्रश्न कधी भेडसावला नाही. मात्र, या गावाला पाणी पुरवण्यासाठी असलेली जलुबाईची ही विहीर यंदा आटली. परिणामी, आज या पाड्याला आटगाव, पेंढारघोळच्या सरपंच पद्मावती बरोरा यांच्या प्रयत्नाने टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या विहिरींच्या वरच्या बाजूला असणारा तलावही यंदा लवकरच आटला. यामुळे परिसराला बारमाही पाणीपुरवठा केल्यानंतरही भरून राहणाºया या विहिरीने आता तळ गाठला आहे. विहीर कोरडी झाल्याने या पाड्यांना पाण्यासाठी पावसाची वाट पाहावी लागणार आहे. या पाड्यातच आदिवासी आश्रमशाळा आहे. सध्या विद्यार्थ्यांची परीक्षा संपल्याने ते घरी गेले आहेत. त्यामुळे त्यांची गैरसोय टळली आहे. सातशे ते साडेसातशे लोकसंख्या असलेल्या या पाड्याला दररोज टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
अखेर दुर्गापूरवासीयांना टँकरने पाणीपुरवठा
मुरबाड : शहापूरपाठोपाठ मुरबाड तालुक्यातही पाणीटंचाई तीव्र होते आहे. त्यातच, आठवडाभरापूर्वी तालुक्यातील दुर्गापूर येथील ‘पाण्यासाठी नववधू विहिरीवर’ गेल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आणि हे गाव एकदम प्रकाशझोतात आले. मुरबाड पंचायत समितीने त्याची तत्काळ दखल घेत तेथे टँकरची सुविधा उपलब्ध केल्याने दुर्गापूर ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
डिसेंबरपासून धसई परिसरातील कळभांड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दुर्गापूर येथील ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र, तरीही दुर्गापूर गावाचा समावेश टंचाई आराखड्यात झाला नाही.
मुरबाड तालुक्यातील २०७ गावांपैकी चार गावे आणि १४ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई असून त्यात अजून वाढ होऊ शकते. १० गावे आणि १५ वाड्यांमध्येदेखील तीव्र स्वरूपात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आता दुर्गापूर गावाला त्यात प्राधान्य दिल्याने त्या ठिकाणी दररोज दोन टँकरने पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून मिळाली आहे.
पाऊस लवकर गेल्याने या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे टंचाई निर्माण झाली आहे. त्यावर तोडगा म्हणून टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
- पद्मावती बरोरा, सरपंच, आटगाव-पेंढरघोळ ग्रामपंचायत
कधीही न आटणारी विहीर आटल्याने पाड्यात टंचाई निर्माण झाली आहे. त्यावर मात करणे सुरू आहे. पुढच्या वर्षी हाच त्रास जाणवू नये, यासाठी उपाययोजना करण्यात येईल.
- भास्कर बरोरा, माजी सरपंच