तानसा धरण भरले; तर मोडकसागर भरण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 02:07 AM2019-07-26T02:07:02+5:302019-07-26T06:15:32+5:30

जिल्ह्यात सरासरी १४६ मिमी पाऊस : ३३ गावांना सतर्कतेचा इशारा, बारवीची स्थितीही सुधारली

Tansa Dam filled; So on the way to fill ModakSagar | तानसा धरण भरले; तर मोडकसागर भरण्याच्या मार्गावर

तानसा धरण भरले; तर मोडकसागर भरण्याच्या मार्गावर

Next

ठाणे : जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील महानगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्येही पावसाचा जोर कायम आहे. यामुळे तानसा धरण भरल्याने तानसासह वैतरणा नदीकाठावरील ३३ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २४ तासांच्या कालावधीत एक हजार २७.९८ मिमी पाऊस पडला असून जिल्हा प्रशासनाने या पावसाची सरासरी नोंद १४६.८५ मिमी इतकी केली आहे.

तानसासह वैतरणा नदीवरील मोडकसागर धरण भरण्याच्या स्थितीत असल्यामुळे या दोन्ही नदीकाठांवरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा १० दिवसांपूर्वीच दिला होता. यानुसार, तानसा धरण गुरुवारी दुपारी २.३० वाजता भरून वाहू लागले. तानसा धरणाची गुरुवारी ४२१.९६ फूट पाण्याची पातळी होताच ते भरून वाहू लागले आहे.

मोडकसागर धरणाची ५२९.८५ फूट पाण्याची पातळी आहे. भातसा धरणात सध्या १२८.४८ मीटर पाण्याची पातळी तयार झाली आहे. तर, ठाणे जिल्ह्यास पाणीपुरवठा करणाºया बारवी धरणात ६६.६८ टक्के पाणीसाठा तयार आहे. तर, वाढीव पाणीसाठ्यानुसार बारवीत ४५.८७ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास काही दिवसांमध्ये अन्यही धरणे भरून वाहण्याची दाट शक्यता आहे.

तलावांमध्ये ५७ टक्के जलसाठा
मुंबई - तानसा तलाव भरुन वाहू लागल्याने पाण्याच्या चिंतेत असलेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र अद्यापही तलावात ४० टक्के जलसाठा कमी आहे. मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा सुरू राहण्यासाठी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर जलसाठा असणे आवश्यक आहे. मात्र यावेळी पाऊस उशिरा आला, त्यामुळे तलावांमधील पाण्याची पातळी झपाट्याने खालावली. आजच्या घडीला तलावांमध्ये ५७ टक्के जलसाठा आहे. तर याच काळात गेल्या दोन वर्षांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक जलसाठा होता. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

मुंबईला दररोज तीन हजार ३८० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. तलावांमध्ये ५० टक्के जलसाठा जमा झाल्यानंतर मुंबईत गेली वर्षभर सुरू असलेली दहा टक्के पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी तुळशी तलाव भरून वाहिला होता. मात्र या तलावातून केवळ १८ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा दररोज होत असतो. तानसा तलावातून दररोज ४५५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो.

भिवंडीत सर्वाधिक पाऊस
जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात २०० मिमी, तर याखालोखाल उल्हासनगरमध्ये १७५, कल्याणला १५३, अंबरनाथला १५२.६०, शहापूरला १५० आणि ठाणे येथे १११ मिमी पाऊस पडला. सर्वात कमी मुरबाड तालुक्यात अवघा ८६ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

Web Title: Tansa Dam filled; So on the way to fill ModakSagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.