तानसा-मध्य वैतरणाचा पाणीसाठा ९० टक्क्यांच्या पार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 01:00 AM2020-08-20T01:00:23+5:302020-08-20T01:00:35+5:30

भातसा आणि बारवी धरणांतील पाणीसाठ्यातदेखील मोठी वाढ झाल्याने सर्वत्र दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.

Tansa-Madhya Vaitarna water storage exceeds 90% | तानसा-मध्य वैतरणाचा पाणीसाठा ९० टक्क्यांच्या पार

तानसा-मध्य वैतरणाचा पाणीसाठा ९० टक्क्यांच्या पार

Next

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून झालेल्या समाधानकारक पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात दिलासादायक वाढ झाली आहे. यात मोडकसागर १०० टक्के भरून वाहू लागले आहे. त्यापाठोपाठ आता तानसा आणि मध्य वैतरणा या दोन्ही धरणांतील पाणीसाठा ९० टक्क्यांच्यावर गेला आहे. तसेच भातसा आणि बारवी धरणांतील पाणीसाठ्यातदेखील मोठी वाढ झाल्याने सर्वत्र दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.
ठाणे जिल्ह्यात पावसाचा सुरू असलेला लपंडाव, त्यात धरणक्षेत्रात दिलेली ओढ यामुळे धरणांच्या पाणीपातळीत होत असलेली घट यामुळे मुंबईसह ठाणे जिल्हावासीयांना भविष्यात पाणीचिंता भेडसावणार, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, मागील आठ ते दहा दिवसांत शहरी, ग्रामीण भागांसह धरणांच्या क्षेत्रातदेखील पावसाने दमदार हजेरी लावल्याने हे चित्र पूर्णत: बदलले आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. त्यात मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर धरण मंगळवारी रात्री पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ठरली आहे.
ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे त्यातील पाणीसाठा ७७.८८ टक्क्यांवर पोहोचला.
तर, भातसा धरणातील पाणीसाठा ८७.८४ टक्के इतका झाला आहे. ठाणे जिल्ह्यात असलेल्या मध्य वैतरणा धरणातील पाणीसाठादेखील ९१.७१ टक्क्यांवर गेला आहे. तसेच तानसा धरणातील पाणीसाठ्याचीही ९२.१८ टक्के इतकी नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाने या धरणांच्या क्षेत्रात असेच बरसणे सुरू ठेवल्यास ही धरणेदेखील लवकरच भरून वाहण्यास सुरुवात होईल, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Tansa-Madhya Vaitarna water storage exceeds 90%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण