मुंबईकरांसाठी खुशखबर, मोडकसागर पाठोपाठ तानसाही ओव्हरफ्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 07:30 PM2017-07-18T19:30:40+5:302017-07-18T19:30:40+5:30
मुंबईच नव्हे तर तलाव परिसरातही जोरदार बरसणाऱ्या पावसाने मुंबईकरांसाठी खुशखबर आणली आहे. मोडक सागर तलावपाठोपाठ दोनच दिवसात तानसा तलावही भरून वाहू लागला आहे
ऑनालाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - मुंबईच नव्हे तर तलाव परिसरातही जोरदार बरसणाऱ्या पावसाने मुंबईकरांसाठी खुशखबर आणली आहे. मोडक सागर तलावपाठोपाठ दोनच दिवसात तानसा तलावही भरून वाहू लागला आहे. मुसळधार पावसामुळे सर्वच तलावांमध्ये एकूण २७४ दिवसांचा जलसाठा जमा झाला आहे.
यावर्षी पावसाने मुंबईत लेट एन्ट्रीनंतरही जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईचे पाणी टेन्शन यंदा संपणार आहे. मुसळधार पाऊस सतत तलाव परिसरात बरसात असल्याने मोडक सागर तलाव शनिवारी सकाळी भरून वाहू लागला होता. तर अन्य प्रमुख तलावांमध्येही जलसाठा झपाट्याने वाढत आहे. त्यावेळी तानसा तलावही काठोकाठ भरण्याच्या मार्गावर होता.
त्याप्रमाणे आज संध्याकाळी ४ वाजून ५५ मिनिटांनी तानसा तलावही भरून वाहू लागला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारा हा दुसरा मोठा तलाव आहे. या तलावातून दररोज मुंबईत सुमारे ५३० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अन्य तलावांमध्ये मिळून दहा लाख २८ हजार दशलक्ष लिटर जमा झाला आहे.
मुंबईला वर्षभर चांगला पाणी पुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी १४ लाख दशलक्ष लीटर जलसाठा असणे अवाश्यक आहे.
मुंबईला दररोज 3750 दशलश लीटर्स पाणीपुरवठा होतो.
मुंबईत पाण्याची मागणी दररोज 4200 दशलक्ष लीटर्स एवढी आहे.
दररोज 25 ते 30 टक्के म्हणजे सुमारे नऊशे लीटर्स पाणी गळती व चोरीमध्ये वाया जात आहे.
या तारखेला तलावांमध्ये एकूण जलसाठा (आकडे दशलक्ष लिटर्समध्ये )
२०१७- दहा लाख २८ हजार ४१५
२०१६- सात लाख २६ हजार ३५५
२०१५-दोन लाख ७२हजार १६०