तानशेत, उंबरमाळीत लोकलमध्ये चढणे झाले धोकादायक, प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 06:45 AM2017-11-30T06:45:52+5:302017-11-30T06:46:14+5:30
कसा-याकडे जाणारी तानशेत (थानशिट) आणि उंबरमाळी ही मध्य रेल्वेच्या मार्गावरील दोन स्थानके प्रवाशांना प्रवासासाठी अत्यंत धोकादायक बनली असून....
भातसानगर : कसा-याकडे जाणारी तानशेत (थानशिट) आणि उंबरमाळी ही मध्य रेल्वेच्या मार्गावरील दोन स्थानके प्रवाशांना प्रवासासाठी अत्यंत धोकादायक बनली असून येथून गाडीत चढउतार करणे, ही तारेवरची कसरतच ठरत आहे.
अनेक वर्षांपूर्वीपासूनची ही स्थानके असून येथे फलाटच नाही. तर, प्रवाशांना रेल्वेत चढउतार करण्यासाठी धक्का तयार करण्यात आलेला आहे. मात्र, तोही अनेक ठिकाणी तुटल्याने त्यात पाय अडकून पडण्याच्या आणि कधी रेल्वेखाली जाण्याच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच, या कठड्याला असणारा मातीचा भराव पावसाने वाहून गेल्याने कठड्यावर चढणेही धोक्याचे झाले आहे. तानशेत आणि उंबरमाळी या स्थानकांवर रेल्वे पूर्णपणे थांबल्यानंतरच काळजीपूर्वक उतरावे लागत आहे. जर का चढताना, उतरताना तोल गेला, तर रेल्वेखाली जाण्याची भीती आहे. या स्थानकांवरून शेकडो प्रवासी जीव मुठीत धरून दररोज असा प्रवास करत असतात.
या स्थानकांसाठीच्या सुविधांसाठी अनेकदा मागणी करूनही ती स्थानके तोट्यात असल्याच्या कारणाखाली त्यांना सुविधा मिळत नसल्याचे अधिकारी सांगतात. ही गोष्ट जरी खरी असली तरी फायद्यात असलेल्या स्थानकांचा निधी जर येथे वापरला, तर निरपराधांचे जीव तरी वाचतील, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. या स्थानकांसाठीचा विकास व्हावा, यासाठी प्रवासी संघटना सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांना हवे तसे यश अजूनही मिळाले नसल्याचे संघटनांचे पदाधिकारी सांगतात.
यासंदर्भात रेल्वे अधिकाºयांना विचारले असता त्यांनी सांगितले की, हे स्थानक तोट्यात असल्यामुळे या दोन्ही ठिकाणी सुविधा देता येत नाही. त्या द्यायच्या म्हटल्यास रेल्वेवर त्याचा बराच ताण पडतो. त्यामुळे त्या मागण्या आजपर्यंत पूर्ण होऊ शकल्या नसल्याचे त्यांनी सांगितले.
आम्ही संघटनेच्या माध्यमातून या स्थानकांच्या सुविधेसाठी सातत्याने मागणी करत असून माजी खा. सुरेश टावरे यांच्या कारकिर्दीत निदान हे कठडे तरी झाले. मात्र, इतर कुणीही त्यासाठी खास प्रयत्न केले नाहीत.
-शैलेश राऊत, कल्याण
-कसारा रेल्वे प्रवासी संघटना