पाणीपट्टी न भरणाऱ्या १२१ जणांच्या नळ जोडण्या तोडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:40 AM2021-03-18T04:40:28+5:302021-03-18T04:40:28+5:30
भाईंदर : पाणीपट्टी न भरणाऱ्या १२१ थकबाकीदारांच्या नळजोडण्या तोडून मीरा-भाईंदर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणीपट्टी वसुलीसाठी धडक कारवाई केली आहे. ...
भाईंदर : पाणीपट्टी न भरणाऱ्या १२१ थकबाकीदारांच्या नळजोडण्या तोडून मीरा-भाईंदर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणीपट्टी वसुलीसाठी धडक कारवाई केली आहे.
पाणीपट्टी भरण्याची महापालिकेने ऑनलाइन सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. तरीही अनेक थकबाकीदार पाणीपट्टी भरायला टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपट्टी प्रभावीपणे वसुलीसाठी उपअभियंता शरद नानेगावकर व किरण राठोड यांना नियंत्रण अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. त्यांच्या अधिपत्याखाली पाच पथके तैनात केली आहेत. या पथकात कनिष्ठ अभियंता, लिपिक, मिस्त्री, प्लंबर व मीटर रीडर यांची नेमणूक केली आहे.
ही पथके थेट थकबाकीदारांच्या आस्थापना किंवा निवासाच्या ठिकाणी जाऊन पाणीपट्टी भरण्यास सांगत आहेत; परंतु पाणीपट्टी भरण्यास नकार दिल्यास त्यांच्या नळजोडण्या तोडण्याची कारवाई पालिकेने सुरू केली आहे. १५ मार्चपर्यंत पालिकेने १२१ जणांच्या नळजोडण्या तोडल्या आहेत. पालिकेने तोडलेल्या नळजोडण्यांच्या थकबाकीदारांच्या यादीत बार-लॉज व्यावसायिक संतोष पुत्रण, मंत्रा बार, हॉटेल सनशाईन इन, हॉटेल सिटी लाईटसह अनेक इमारती, चाळी व व्यक्तिगत घरांच्या मालकांचा समावेश आहे. पालिकेच्या नळजोडणी तोडण्याच्या धडक कारवाईमुळे थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.