स्वच्छतागृहातील नळ व इतर साहित्याची होते चोरी उल्हासनगर रेल्वे स्टेशनवरील स्वच्छतागृह बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 04:34 PM2021-12-14T16:34:51+5:302021-12-14T16:35:20+5:30
चाकरमान्यांची कुचंबणा
- सदानंद नाईक
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूचे बांधलेले नवीन स्वच्छतागृह बंद असल्याने, चाकरमान्यांची कुचंबणा होत आहे. स्टेशन व्यवस्थापक मनोहर चौधरी यांनी स्वच्छतागृहात चोरी होत असल्याने व ठेक्यावर घेण्यास कोणी ठेकेदार इच्छुक नसल्याने स्वच्छतागृह बंद ठेवल्याची माहिती स्टेशन चौधरी यांनी दिली.
उल्हासनगर रेल्वे स्टेशन मधून दररोज हजारो नागरिक ये-जा करतात. नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नं- १ व २ वर स्वच्छतागृह बांधले आहे. मात्र प्लॅटफॉर्म नं-१ वर स्वच्छतागृह बंद ठेवण्यात येत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. नागरिकांच्या मागणीनुसार शिवसेनेचे नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून स्टेशनच्या पश्चिम बाजूला ३ वर्षांपूर्वी स्वच्छतागृह बांधले. मात्र त्याचा फायदा नागरिकांना होत नाही. समाजसेवक प्रशांत चंदनशिव यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही स्वच्छतागृह बंद आहे. चाकरमान्यांकडून स्वच्छतागृह सुरू करण्याची मागणी स्टेशन व्यवस्थापक यांच्याकडे होऊनही, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रं-१ वर लाखो रुपये खर्चून बांधलेले स्वच्छतागृह सुरू करा. असा पाठपुरावा रेल्वे प्रवासी संघटनेने केला. मात्र त्यांनाही यश आले नाही. स्वच्छतागृह चालविण्यासाठी कोणीही ठेकेदार पुढे येत नसून, स्वच्छतागृहातून दोन वेळा नळ व इतर साहित्य चोरीला गेले. त्यांच्या भीतीतून स्वच्छतागृह बंद ठेवण्यात आल्याचे स्टेशन कार्यालयाने सांगितले. रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला नशेखोर, गर्दुल्ले, भुरटे चोर, गुन्हेगार आदींचा वावर असल्याने, त्यांच्या भीतीतून स्वच्छतागृह चालविण्यास घेत नसल्याचे बोलले जात आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी याबाबत लक्ष घातल्यास स्टेशनचा विकास होऊन, स्वच्छतागृह सुरू होणार असल्याचे बोलले जाते. स्टेशन व्यवस्थापक मनोहर चौधरी यांनी स्टेशन मध्ये सीआरपीएफ पोलिसांची संख्या अपुरी असल्याने, असे प्रकार घडत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.