लक्ष्य 100 कोटी, वसुली फक्त 31 कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 12:46 AM2021-01-05T00:46:17+5:302021-01-05T00:46:25+5:30

मालमत्ताकर : मोहीम गतिमान करण्याची गरज

Target 100 crores, recovery only 31 crores! | लक्ष्य 100 कोटी, वसुली फक्त 31 कोटी!

लक्ष्य 100 कोटी, वसुली फक्त 31 कोटी!

Next


सदानंद नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क 
उल्हासनगर : महापालिकेच्या मालमत्ताकर विभागाने १०० कोटींचे लक्ष्य ठेवले असताना, डिसेंबरअखेर केवळ ३१ कोटींची वसुली झाल्याची माहिती करनिर्धारक संकलक जेठानंद करमचंदानी यांनी दिली. आता ही मोहीम तीव्र करून २० हजारांपेक्षा जास्त मालमत्ताकर असणाऱ्या मालमत्ताधारकांना वॉरंट बजावणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मालमत्ताकरवसुली गतीने होण्यासाठी मालमत्ताकर विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. विभागाचे करनिर्धारक संकलकपद अनेक महिन्यांपासून रिक्त असून अतिरिक्त पदभार जेठानंद करचंदाणी यांच्याकडे दिला आहे. गेल्या महिन्यात करवसुलीत वाढ झाली असली तरी, १०० कोटींचे लक्ष्य मार्चअखेर पूर्ण होणार का, यावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. नऊ महिन्यांत फक्त ३१ कोटींची मालमत्ताकरवसुली झाली असून ५०० कोटींपेक्षा जास्त थकबाकी असल्याची माहिती विभागप्रमुखांनी दिली. उपमहापौर भगवान भालेराव यांनी करवसुली झाली, तरच महापालिकेची आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली. गेला महिनाअखेर सुटीवर गेलेले आयुक्त डॉ. राजा दयानिधी सोमवारी हजर झाले. त्यांनी सकाळी विभाग अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विकासकामांबाबत सूचना केल्या आहेत.
मालमत्ताकर तसेच एलबीटीअंतर्गत मिळणारे शासन अनुदान हे पालिकेचे मुख्य उत्पन्नाचे स्रोत आहेत. कोरोनाकाळात मालमत्ताकरवसुली ठप्प पडल्याने, महापालिकेचा कारभार शासन अनुदानावर सुरू असल्याची टीका मध्यंतरी झाली होती. मात्र, मार्चअखेर १०० कोटींचे लक्ष्य पूर्ण करण्याचा दावा उपायुक्त मदन सोंडे यांनी केला. अनधिकृत बांधकाम नियमित करण्याची प्रक्रिया सुरू केल्यास, पालिकेस मोठे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. मात्र, महापालिका प्रशासन याबाबत अनुकूल का नाही, असा प्रश्नही विचारला जात आहे.


मालमत्ताकर विभागासाठी 
अभय योजना राबवा - गंगोत्री

मालमत्ताकर वसुलीसाठी नागरिकांना भावनिक साद घालण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी मालमत्ताकर वसुलीसाठी जनजागृती अभियान राबविले असल्याचे मत सभागृह नेते भरत गंगोत्री यांनी व्यक्त केले. कोरोनामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. मालमत्ताकर विभागासाठी अभय योजना राबविण्याची शक्यता गंगोत्री यांनी व्यक्त केली.

Web Title: Target 100 crores, recovery only 31 crores!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.