केडीएमसीच्या गळक्या कार्यालयाला ताडपत्रीचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 01:47 AM2020-08-21T01:47:34+5:302020-08-21T01:47:42+5:30
यात काही दस्तावेजही भिजले असून, येथील पसारा पाहता ही जागा एकप्रकारे कर्मचाºयांसाठी गैरसोयीची ठरत आहे.
डोंबिवली : केडीएमसीच्या डोंबिवलीतील विभागीय कार्यालयात ठिकठिकाणी पावसामुळे गळती सुरू झाली आहे. येथील तळ आणि पहिल्या मजल्यावरील स्वच्छतागृहांमध्ये छतातून पाण्याची गळती होत असतानाच आता महत्त्वाचा विभाग असलेल्या जन्ममृत्यू नोंदणी कार्यालयातही पाणी ठिबकत आहे. गेल्या काही दिवसांपासून जोरदार पडणाऱ्या पावसामुळे हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे येथील कामकाजासाठी कर्मचाऱ्यांना ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला आहे. यात काही दस्तावेजही भिजले असून, येथील पसारा पाहता ही जागा एकप्रकारे कर्मचाºयांसाठी गैरसोयीची ठरत आहे.
केडीएमसीचे डोंबिवली विभागीय कार्यालय हे रेल्वेस्थानकानजीक अतिशय गजबजलेल्या ठिकाणी आहे. ही वास्तू ४२ वर्षे जुनी आहे. माजी आयुक्त गोविंद बोडके यांच्या कार्यकाळात आॅगस्ट २०१९ मध्ये विभागीय कार्यालयाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला
होता.
महापालिकेच्या स्वनिधीतून हा विकास करणे अशक्य असल्याने खाजगीकरणातून हे काम केले जाणार होते. बोडके यांनी अंमलबजावणीचे आदेशही दिले होते. महापालिका प्रशासकीय कामकाजाची सोय व विभागीय कार्यालयाचे विकेंद्रीकरण करण्यासाठी येथील ‘फ’ आणि ‘ग’ प्रभाग क्षेत्र कार्यालये त्या-त्या प्रभाग क्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी स्थापन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.
त्यानुसार, ‘फ’ प्रभागाचे कार्यालय पी.पी. चेंबर, तर ‘ग’ प्रभागाचे कार्यालय सुनीलनगर येथे हलवण्यात येणार आहे. पी.पी. चेंबरमधील पहिला आणि दुसरा मजला ‘फ’ प्रभागासाठी घेतला जाणार होता. परंतु, याबाबतची कोणतीही कृती अद्याप झालेली नाही. परिणामी, आजही कर्मचारी आणि अधिकारी अवकळा प्राप्त झालेल्या विभागीय कार्यालयात काम करीत आहेत.
तळमजल्यावर ‘ग’ प्रभाग कार्यालय आहे. त्याच्याशेजारी असलेल्या आपत्कालीन विभागाच्या कार्यालयात ड्रेनेजचे पाणी येत असल्याने तेथील कर्मचाºयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
ही समस्या अधूनमधून उद्भवत असताना आता पहिल्या मजल्यावरील जन्ममृत्यू नोंदणी विभागाच्या कार्यालयात पावसामुळे गळती सुरू झाली आहे. त्यामुळे कर्मचाºयांना गैरसोयीला सामोरे जावे लागत
आहे.
तसेच जन्म आणि मृत्यूच्या नोंदीसाठी या विभागात मोठ्या संख्येने येणाºया नागरिकांनाही पुरेशा जागेअभावी कार्यालयाच्या बाहेर रांगेत तिष्ठत उभे राहावे लागत आहे.
गेल्या सात ते आठ दिवसांपासून गळती सुरू असल्याने ताडपत्रीचा आधार घेऊन कामकाज करण्याची नामुश्की येथील कर्मचाºयांवर ओढवली आहे. या कार्यालयातील भिंतींमधूनही पावसाचे पाणी झिरपत असल्याने येथील काही दस्तावेजही भिजले आहेत. प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.
>दुर्घटना घडल्यानंतर जाग येणार का?
के डीएमसीच्या डोंबिवलीतील या इमारतीमधील बहुतांश कार्यालयांमध्ये गळतीचा त्रास होत असून एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. या वास्तूच्या पुनर्विकासाकडे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या झालेल्या दुर्लक्षाबाबतही आश्चर्य व्यक्त होत आहे.