पुस्तकाचे ज्ञान मेंदूपर्यंत नेण्याचे काम आताच्या पिढीचे : प्रज्ञा पंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 05:10 PM2019-10-13T17:10:22+5:302019-10-13T17:12:32+5:30
कवयित्री मनिषा गोडबोले यांच्या कविता संग्रहाचा पुस्तक सोहळा पार पडला.
ठाणे: आजची पिढी ही स्मार्ट फोनवर असते. या स्मार्टफोनने आपल्या मेंदूवर कब्जा केला आहे. पुस्तकाचे ज्ञान मेंदूपर्यंत नेण्याचे, ते पुढच्या पिढीपर्यंत संक्रमीत करण्याचे काम हे आताच्या पिढीने करणे गरजेचे असल्याचे मत लेखिका - कवयित्री प्रज्ञा पंडित यांनी व्यक्त केले. शारदा प्रकाशनतर्फे कवयित्री मनिषा गोडबोले लिखित शब्दगंध या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा आई हॉलमध्ये संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून पंडीत बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, ग्रंथपाल या नोकरीचा मला हेवा वाटतो कारण ते पुस्तकांच्या राज्यात राहत असतात आणि हीच खरी श्रीमंती आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. जेव्हा आपण वाचनालयात किंवा पुस्तक खरेदीसाठी जातो तेव्हा काव्यंसंग्रह फार खरेदी केले जात नाही. ललित, कथा, कादंबरीच जास्त विकत घेतले जातात. परंतू कविता हा आपल्या आयुष्यातील एक भाग आहे. लहानपणी बडबड गीत, शालेय जीवनात कविता, चित्रपटातील गाणी, सांस्कृतिक कार्यक्रमांत, गाणी कविता असा कुठे ना कुठे कवितेशी आपला संबंध येतोच असे सांगत मनिषा गोडबोले यांनी या काव्यसंग्रहात वेगवेगळया विषयांना हात घातला असल्याचे कौतुकोद्गार त्यांनी काढले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांनी आपणच आपल्याला मोठे करायचे असते असे सांगितले. ते म्हणाले, सुचले तसे लिहीले अशी लिहीणारी माणसे प्रामाणिक असतात. आपली कविता आपल्याला आवडायला हवी. बरेच जण प्रस्तावना समिक्षा करतात पण त्यात कौतुक करायचे असते असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी छायाचित्रकार राजेश पिसाट, मोरेश्वर गोडबोले उपस्थित होते. शारदा प्रकाशनचे प्रा. संतोष राणे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. ते म्हणाले, माणसांना जपणारी माणसेच असतात तशा जपणाऱ्या कविता गोडबोले यांनी लिहील्या आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी गाण्यांचा कार्यक्रम पार पडला.