खड्डेमुक्त रस्त्यांसाठी आता टास्क फोर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:44 AM2021-09-26T04:44:28+5:302021-09-26T04:44:28+5:30
ठाणे : शहरातील रस्त्यांमधील खड्ड्यांमुळे आणि अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडीची गंभीर दखल घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी ...
ठाणे : शहरातील रस्त्यांमधील खड्ड्यांमुळे आणि अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडीची गंभीर दखल घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी सर्व संबंधित यंत्रणांची झाडाझडती घेतली. रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचा आदेश देतानाच दुपारी १२ ते ४ या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदीचे निर्देश देऊन वाहतूक कोंडीसह खड्डेमुक्त रस्त्यांसाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्स तैनात करण्याचा आदेशही त्यांनी दिला.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात वाहतूक विभागासह पोलीस आणि संबंधित यंत्रणेची तातडीची बैठक झाली. या टास्क फोर्समध्ये एमएमआरडीए, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभागासह पोलीस आणि सर्व महापालिाकांचे प्रतिनिधी राहणार आहेत.
जेएनपीटीकडे ये- जा करणाऱ्या अवजड वाहनांसाठी नियमित वेळापत्रक तयार करून त्यांच्यासाठी नवी मुंबई, पालघर, पडघा याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात पार्किंग लॉट उभारण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. या शहराच्या सीमांवर कायमस्वरूपी ट्रक टर्मिनल्स उभारण्यासाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश ठाणे व रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना शिंदे यांनी दिले.
या बैठकीला ठाणे, रायगड, पालघरचे जिल्हाधिकारी, ठाणे कल्याण- डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई महापालिका आयुक्त, ठाणे, मीरा- भाईंदर, नवी मुंबई पोलीस आयुक्त, ठाणे ग्रामीण व पालघरचे पोलीस अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, सिडको, एमएसआरडीसी, एनएचएआय, मेट्रो, जेएनपीटी आदी यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.