महिनाभर आधीच रानभाज्यांचा आस्वाद; कोरोनात प्रतिकारशक्ती वाढविण्यात फायदेशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 07:43 AM2021-05-31T07:43:56+5:302021-05-31T07:44:12+5:30
कोरोनाकाळात शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक वनस्पतींच्या सेवनाचे महत्त्व वाढले आहे. गुळवेल, गवती चहा, पुदिना अशा नानाविध गुणधर्म असलेल्या औषधी वनस्पतींचा वापर वाढला आहे.
बोर्डी : चक्रीवादळासह आलेल्या पावसाने ग्रामीण भागात वेळेपेक्षा महिनाभर आधीच रानभाज्या उगवल्या आहेत. आहारातील रानभाज्यांच्या सेवनाने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लाभ होतो. कोरोनाकाळात त्या बहुमूल्य असल्याने निसर्गाने ही किमया घडविल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.
कोरोनाकाळात शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक वनस्पतींच्या सेवनाचे महत्त्व वाढले आहे. गुळवेल, गवती चहा, पुदिना अशा नानाविध गुणधर्म असलेल्या औषधी वनस्पतींचा वापर वाढला आहे. मान्सूननंतर रानमाळांवर या रानभाज्यांची उगवण होते. मात्र, चक्रीवादळामुळे चांगला पाऊस झाल्यानंतर गेल्या काही दिवसांत रानभाज्या उगवल्या आहेत. त्या खाण्याची संधी कोरोनाकाळात उपलब्ध झाली आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नागरिकांनी या भाज्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ प्रा. विलास जाधव यांनी केले आहे.
शेवली, कोळी, टाकळा, रानकेळी, सुरण अशा नानाप्रकारच्या रानभाज्या उगवल्या आहेत. त्या औषधी असून, विपुल प्रमाणात खनिजे, जीवनसत्त्वे असतात.
डहाणूच्या कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे दरवर्षी रानभाज्यांचे प्रदर्शन आणि पाककृती स्पर्धा आयोजित केली जाते. चेन्नई येथील स्वामीनाथन फाउंडेशनच्या सहकार्याने परसबागेत अंबाडी, चवळाई, माठ, करटोली, कुर्डू, आदी रानभाज्यांचे संवर्धनही केले जाते. डहाणूतील झारली, किन्हवली या आदिवासी गावांमध्ये परसबागांची प्रात्यक्षिके आयोजित केली जातात.
२५० आदिवासी कुटुंबांना प्रशिक्षण
कोसबाड कृषी विज्ञान केंद्राने गेल्या वर्षी पालघर जिल्ह्यातील २५० आदिवासी कुटुंबांना विविध रानभाज्यांच्या संवर्धनाबाबत प्रशिक्षण दिले.
डॉ. एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली सकस आहार बाग उपक्रमाद्वारे रानभाज्यांचे संवर्धन सुरू आहे.
त्यांच्या सेवनाने कुपोषण निर्मूलनात मदत झाली. जिल्ह्यातील २५० शेतकऱ्यांच्या शेतावर सकस आहार प्रात्यक्षिक आयोजित केले जाणार आहे.
रानभाज्या औषधी गुणधर्मयुक्त असतात. त्यांच्या आहारातील सेवनाने शरीरात रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि हे कोविडकाळात उपयुक्त ठरणार आहे.
- प्रा. रूपाली देशमुख, गृहविज्ञान शास्त्रज्ञ, कोसबाड कृषी विज्ञान केंद्र.