कोरोना रुग्ण कमी झाल्याने टाटा आमंत्रा कोविड केअर सेंटर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:27 AM2021-07-01T04:27:00+5:302021-07-01T04:27:00+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने टाटा आमंत्रा कोविड केअर सेंटर १ जुलैपासून बंद करण्यात ...
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने टाटा आमंत्रा कोविड केअर सेंटर १ जुलैपासून बंद करण्यात आले असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी दिली आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढल्यास हे सेंटर पुन्हा सुरू केले जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.
महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव मार्च २०२० मध्ये सुरू झाला. महापालिकेकडे दोन मोठी रुग्णालये आणि १५ हेल्थ सेंटर होते. मात्र, पुरेसा डॉक्टर, नर्सचा स्टाफ नसल्याने त्या ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार कसे करायचे, असा प्रश्न होता. जम्बो कोविड सेंटर तातडीने उभारणे शक्य नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी टाटा आमंत्रा या बड्या गृहसंकुलात कोविड केअर सेंटर सुरू करण्याची परवानगी महापालिकेस दिली. १ एप्रिल २०२० पासून टाटा आमंत्रा येथे कोविड केअर सेंटर सुरू झाले. या कोविड सेंटरची क्षमता तीन हजार रुग्णांवर उपचार करण्याची होती. वर्षभरात एका दिवसात २५०० रुग्ण उपचार घेत होते. महापालिका हद्दीतील कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी कोविड केअर सेंटरची कामगिरी मोलाची ठरली. दिवसाला दोन हजार रुग्णांना चहा, नाश्ता, दोन वेळचे जेवण आणि राहण्याची उत्तम सोय स्वतंत्र फ्लॅटमध्ये केली होती. उद्यापासून हे कोविड सेंटर बंद करण्यात येत आहे. त्याऐवजी कल्याण पश्चिमेतील आर्ट गॅलरी जम्बो कोविड सेंटरमध्ये कोविड केअर सेंटर चालविले जाणार आहे. तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा टाटा आमंत्रा कोविड केअर सेंटर सुरू केले जाईल, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.
तिसरी लाट पाहता रुक्मिणीबाई रुग्णालय हे कोविड रुग्णालय करण्यात येणार आहे. तेथील प्रसूती विभाग वसंत व्हॅली येथील सूतिकागृहात स्थलांतरित केला जाणार आहे. उद्यापासूनच तेथे प्रसूतीसाठी गर्भवतींना पाठविण्यास सुरुवात केली जाणार आहे. मात्र, तातडीची प्रसूतीची केस आल्यास ती रुक्मिणीबाई रुग्णालयात केली जाईल. टाटा आमंत्रा कोविड केअर सेंटर बंद केल्याने तेथील १५ डॉक्टर, २७ नर्स, ४१ वॉर्डबॉय हे वसंत व्हॅली आणि रुक्मिणीबाई रुग्णालयात शिफ्ट केले जाणार आहेत.
चौकट
कोरोना पॉझिटिव्हिटी रेट - २.४० टक्के
कोरोना डेथ रेट - १.९० टक्के
रुग्ण बरे होण्याचा रेट - ९७.३२ टक्के
आजमितीस दिवसाला अँटिजन आणि आरटीपीसीआर टेस्टचे प्रमाण - ३०००
-----------------