Tauktae Cyclone: झाडे कोसळलेल्या ठिकाणांना भरपावसात विरोधीपक्ष नेत्यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 04:57 PM2021-05-17T16:57:49+5:302021-05-17T17:02:13+5:30

तौक्ते  चक्रीवादळाचा फटका ठाण्याच्या काही भागांनाही बसला आहे. ठाणे शहरात सुटलेल्या थोड्याशा वार्‍यानेही 12 झाडे उन्मळून पडली असून 13 झाडांच्या फांद्या कोसळल्या.

Tauktae Cyclone Opposition Leader Visits Tree Collapse | Tauktae Cyclone: झाडे कोसळलेल्या ठिकाणांना भरपावसात विरोधीपक्ष नेत्यांची भेट

Tauktae Cyclone: झाडे कोसळलेल्या ठिकाणांना भरपावसात विरोधीपक्ष नेत्यांची भेट

Next

ठाणे (प्रतिनिधी)- तौक्ते  चक्रीवादळाचा फटका ठाण्याच्या काही भागांनाही बसला आहे. ठाणे शहरात सुटलेल्या थोड्याशा वार्‍यानेही 12 झाडे उन्मळून पडली असून 13 झाडांच्या फांद्या कोसळल्या. या ठिकाणी विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी भेटी दिल्या. दरम्यान, ही झाडे कोसळण्याचे प्रकार ठाणे महानगर पालिकेचे वृक्षप्राधिकरणामुळेच झाले आहेत. सध्या कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी भावी काळात एखाद्याचा जीव गेला तर त्यास जबाबदार कोण असेल? असा सवाल  करुन जर वृक्षप्राधिकरण खात्याचे काम जर अग्नीशमन दलाकडून केले जात असेल तर हे खाते हवेच कशाला, ते बरखास्त करुन टाका, अशा शब्दात शानू पठाण यांनी संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे, सोमवारी ठामपाची स्थायी समितीची बैठक होती. या बैठकीमध्ये शानू पठाण हे रस्त्यावरुनच सहभागी झाले. त्यांनी सर्व सदस्यांना तसेच सभापतींना रस्त्यावर पडलेल्या झाडांच्या फांद्यांचा खच आणि उन्मळून पडलेली झाडे ऑनलाईन दाखवून कारवाईची मागणी केली. 

तौक्ते चक्रीवादळामुळे ठाण्यातही काही ठिकाणी पडझड झाली. ठाण्याच्या अनेक भागात झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी फांद्या कोसळल्या. झाडे उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये काही जीवितहानी झाली नसली तरी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी सर्व ठिकाणांची पाहणी केली. या पाहणीमध्ये राम मारुती रोड , नौपाडा आदी भागात एकही अधिकारी फिरकला नसल्याचे पठाण यांच्या निदर्शनास आले. विशेष म्हणजे, छ. शिवाजी महाराज रुग्णालयाची कमान कोसळल्यानंतरही त्या ठिकाणी अधिकारी पोहचलेच नसल्याचे दिसून आले.  या पाहणीनंतर, ठामपाच्या वृक्षप्राधिकरण खात्याने वेळीच फांद्यांची छाटणी न केल्यामुळे या दुर्घटना घडल्या असल्याचा आरोप पठाण यांनी केला. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रम खामकर हे उपस्थित होते. 

दरम्यान, “काही दिवसांपूर्वी गडकरी रंगयातन येथे रिक्षावर झाड कोसळून दोघांचा मागील वर्षी पाचपाखाडी येथे झाडाची फांदी कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये एका युवकाचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या स्मृती ताज्या असतानाही ठामपाच्या वृक्षप्राधिकरण खात्याकडून योग्य अशी कार्यवाही केली जात नाही. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये सुमारे 400 झाडांची छाटणी करण्यात आली होती. मात्र, ठाणे पालिकेने झाडांच्या छाटणीकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. वास्तविक पाहता, आठवडाभर आधी वादळाची पूर्वकल्पना देण्यात आलेली असतानाही ठाणे पालिकेच्या वृक्षप्राधिकरण खात्याने तपासणी करायला हवी होती. मात्र, अशी तपासणी न केल्यामुळेच धोकादायक झालेले वृक्ष कोसळले आहेत. अद्याप मान्सूनला सुरुवात झालेली नाही. पावसाळ्यात अशा दुर्घटना घडून एखाद्याचा जीव गेला तर त्याची जबाबदारी वृक्षप्राधिकरणचे अधिकारी घेतील का?  या खात्याकडे जबाबदार अधिकारी नाहीत, उपयुक्त साधने नाहीत; अशा वेळी दुर्घटना घडली की अग्नीशमन दलाला पाचारण केले जाते. जर, प्रत्येक वेळी अग्नीशमन दलाची क्रयशक्ती वाया घालवली जात असेल तर वृक्षप्राधिकरण खाते हवेच कशाला?” असा सवालही शानू पठाण यांनी उपस्थित केला आहे.

ऑनलाईन स्थायी समितीत दाखविले रस्त्यावरचे दृश्य
सोमवारी ठाणे महानगर पालिकेच्या स्थायी समितीची ऑनलाईन बैठक होती. या बैठकीमध्ये पाहणी दौर्‍यातूनच शानू पठाण हे सहभागी झाले. त्यांनी स्थायी समितीच्या सभापतींना रस्त्यावर पडलेल्या झाडांच्या फांद्याचा खच दाखविला. तसेच, एकही अधिकारी घटनास्थळी नसल्याचे दाखवून दिले. एकूणच पालिकेच्या कारभाराची ऑनलाईन पोलखोल शानू पठाण यांनी केली.

 

Web Title: Tauktae Cyclone Opposition Leader Visits Tree Collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.