भिवंडीतील टावरे स्टेडियम झाले स्वच्छ...लोकमतच्या बातमीची प्रशासनाने घेतली दखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 03:28 PM2022-08-04T15:28:38+5:302022-08-04T15:29:40+5:30
दै. लोकमतच्या या बातमीची दखल भिवंडी मनपाचे प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी घेतल्याने अवघ्या दोनच दिवसात टावरे स्टेडियम स्वच्छ करण्यात आले आहे
नितिन पंडीत
भिवंडी - शहरातील धोबी तलाव परिसरात शहराच्या मध्यभागी असलेल्या स्वर्गीय परशुराम धोंडू टावरे स्टेडियमच्या सुरक्षे बरोबर स्वच्छतेकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होते.मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षीत कारभारामुळे स्टेडियमच्या पेव्हेलियन मध्ये गर्दुल्ल्यांनी ठाण मांडत दारूच्या पार्ट्या व गुटखा तंबाखूची पाकिटे फेकून दिल्याने याठिकाणी गुटखा तंबाखूच्या रिकाम्या प्लास्टिक कागदांचा व दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पवेलियनमध्ये पडला होता. त्याचबरोबर पवेलियन मधील स्वच्छतागृहांची देखील अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. या संदर्भात दैनिक लोकमतने दिनांक २९ जुलै रोजी टावरे स्टेडियम बनला गर्दुल्ल्यांचा अड्डा, या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती.
दै. लोकमतच्या या बातमीची दखल भिवंडी मनपाचे प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी घेतल्याने अवघ्या दोनच दिवसात टावरे स्टेडियम स्वच्छ करण्यात आले आहे. विशेष म्हणजे टावरे स्टेडियमवर पोलीस भरती व सैन्य भरती , व्यायामासाठी तसेच चालण्यासाठी अनेक नागरिक या स्टेडियमवर येत असतात मात्र स्टेडियमवरील अस्वच्छतेमुळे भावी सैनिकांना व व्यायामपटूंना घाणीचा प्रचंड त्रास होत होता. याबाबत लोकमतने दिलेल्या बातमी नंतर मनपा प्रशासन खडबडून जागे झाले व स्टेडियमची स्वच्छता केली आहे. दै. लोकमतच्या बातमीमुळे झालेल्या स्टेडियमच्या स्वच्छतेमुळे स्टेडियमवर सरावासाठी येणाऱ्या तरुणांमध्ये आनंद व उत्साह असून त्यांनी लोकमत परिवाराचे जाहीर आभार मानले आहेत.