पॉक्सो ॲक्टनुसार टॅक्सीचालकास १० वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:40 AM2021-03-05T04:40:35+5:302021-03-05T04:40:35+5:30
ठाणे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या अब्दुल हुसेनमिया शेख (६०) याला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एच.एम. पटवर्धन ...
ठाणे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या अब्दुल हुसेनमिया शेख (६०) याला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एच.एम. पटवर्धन यांनी गुरुवारी दोषी ठरवून पॉक्सो ॲक्टनुसार १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. आरोपी हा टॅक्सीचालक असून ही घटना १४ मे २०१८ रोजी शीळफाटा परिसरात घडली होती, अशी माहिती सरकारी वकील विजय मुंढे यांनी दिली.
पीडित मुलगी आणि आरोपी हे एकाच इमारतीत राहणारे आहेत. पीडित मुलगी ८ वर्षांची असून, ती त्या इमारतीत राहणाऱ्या तिच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत १४ मे २०१८ रोजी खेळत होती. त्या वेळी आरोपीने इशारा करून बोलावून तिला पहिल्या मजल्यावर नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला हाताने मारहाण करून दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शीळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी १५ मे २०१८ रोजी आरोपीला अटक केली. हे प्रकरण न्यायाधीश पटवर्धन यांच्यासमोर आल्यावर सरकारी वकील विजय मुंढे यांनी सादर केलेले पुरावे आणि सात साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून आरोपी अब्दुल शेख याला दोषी ठरवून १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी केला. तर पेहरावी म्हणून सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील यांनी काम पाहिले.