टॅक्सीचालकाला डोंबिवलीत मारहाण
By admin | Published: July 5, 2017 06:09 AM2017-07-05T06:09:43+5:302017-07-05T06:09:43+5:30
प्रवाशाची वाट पाहणारे मुंबईतील टॅक्सीचालक हाफिज सिद्दिकी यांना दोन अनोळखी दुचाकीस्वारांनी मारहाण केल्याची घटना रविवारी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : प्रवाशाची वाट पाहणारे मुंबईतील टॅक्सीचालक हाफिज सिद्दिकी यांना दोन अनोळखी दुचाकीस्वारांनी मारहाण केल्याची घटना रविवारी मध्यरात्री डोंबिवलीच्या होरायझन हॉलसमोर घडली. मुस्लिम असल्याने मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी केल्याने खळबळ उडाली. पण हा वाद गाडीच्या पार्किंगवरून झाला असून त्याला धर्माचा रंग देऊन विपर्यास केल्याचे मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले यांनी सांगितले.
सिद्दिकी घाटकोपरहून डोंबिवली पश्चिमेत प्रवासी घेऊन आले होते आणि मानपाडा येथून पुन्हा एअरपोर्टला जाणाऱ्या प्रवाशाची ते वाट पाहात होते. गाडी रस्त्याकडेला लावल्याचा त्यांचा दावा आहे. तेव्हा तेथे मोटारसायकलवरून दोन तरूण आले आणि त्यांनी विनाकारण मारहाण केल्याचे सिद्दिकी यांचे म्हणणे आहे. तेव्हा ते प्रवासी घेऊन मुंबईत गेले. पण दुसऱ्या दिवशी जवळच्या खाजगी रू ग्णालयात उपचार करू न वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेले, तेव्हा तेथील पोलिसांनी त्यांना डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांनी रात्री मारहाणप्रकरणी अदखलपात्र तक्रार दाखल केली.
त्यातील मुस्लिम असल्याने मारहाण केल्याचा सिद्दिकी यांचा आरोप काब्दुले यांनी फेटाळला. गाडी पार्क करण्यावरू न बाचाबाची होऊन मारहाण झाली असावी. तसेच त्यांनी त्वरित गुन्हा दाखल करायला हवा होता, असे मत मांडले. आम्ही त्यामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून त्यात काहीही सापडले नाही, काब्दुले म्हणाले.
पार्किंगवरून वाद
मुस्लिम असल्यानेच आपल्याला दोन दुचाकीस्वारांनी मारहाण केल्याचा आरोप सिद्दीकी यांनी केला आहे. मात्र, पोलिसांनी तो फेटाळला आहे. पार्किंगवरून वाद झाला आहे. तो त्याला धर्माचा रंग देऊन विपर्यास करत आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काब्दुले म्हणाले.