कल्याणमध्ये उद्यापासून टॅक्सी सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 12:03 AM2020-05-31T00:03:31+5:302020-05-31T00:03:37+5:30
५० टॅक्सी धावणार। ट्रेनने लांबून आलेल्या प्रवाशांना देणार सुविधा
अनिकेत घमंडी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : रेल्वेकडून देशभरात विविध ठिकाणी लांबपल्ल्यांच्या गाड्यांची सेवा सोमवार, १ जूनपासून सुरू होत आहे. या गाड्यांमधून येणाऱ्या प्रवाशांना आपल्या घरी जाता यावे, यासाठी कल्याण रेल्वे स्थानकातून ५० टॅक्सींची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पश्चिमेतून १ जूनच्या रात्रीपासून ही सेवा दिली जाईल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी दिली.
लांबपल्ल्यांच्या गाड्यांमधून कल्याणला आलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी टॅक्सीबरोबरच एसटी, केडीएमटीच्या बस सोडण्यात येणार आहेत. बसचे नियोजन त्यांच्या यंत्रणा करणार आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्यासाठी ५० टॅक्सी ठरावीक अंतरावर उभ्या करण्यात येतील. टॅक्सीचालकांना सॅनिटायझर व स्वच्छता ठेवण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.
आरटीओ अधिकाऱ्यांकडे नोंद असलेल्या ५० टॅक्सीच स्टॅण्डवर उभ्या राहतील. आरटीओ अधिकारी तेथे लक्ष देणार आहेत. प्रवासी सुरक्षित राहावेत, यासाठी आवश्यक ती सर्व काळजी टॅक्सीचालकांना घ्यावी लागणार आहे. त्यासाठी त्यांना सुचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असेल. नियम न पाळणाºयांची परवानगीही रद्द केली जाऊ शकते, असे ससाणे म्हणाले.
या भागांत असेल सेवा : कल्याण स्थानकातून या टॅक्सी शहापूर, मुरबाड, बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली, कल्याण ग्रामीण आदी भागांत सेवा देतील. १ जूनपासून पुढील आदेश येईपर्यंत ही सेवा सुरू राहील, असे ससाणे पुढे म्हणाले.