टीबी इमारतीत पुन्हा कोरोना रुग्णांवर उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:37 AM2021-03-28T04:37:56+5:302021-03-28T04:37:56+5:30
ठाणे : जिल्ह्यात मागील चार ते पाच महिन्यांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारातील टीबीची इमारत ...
ठाणे : जिल्ह्यात मागील चार ते पाच महिन्यांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारातील टीबीची इमारत चार ते पाच महिन्यांपासून बंद करण्यात आली होती. त्यामुळे ट्रॉमा केअर सेंटरमधील १३० बेडवर उपचार सुरू होते. मात्र, दीड महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने ही टीबीची इमारत पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तेथे १७० बेडची व्यवस्था आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील ३०० बेड पुन्हा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, मुरबाड, शहापूर तालुक्यात कोरोनाचे एकही केंद्र नसल्याने तेथील कोरोना रुग्णांचा भार जिल्हा सामान्य रुग्णालयावर पडत आहे.
जिल्ह्यात मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर एप्रिलमध्ये जिल्ह्यातील पहिले शासकीय कोविड रुग्णालय म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय घोषित करण्यात आले. तेव्हा तेथे ३०० बेडची व्यवस्था होती. त्यात कालांतराने रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील ३०० ऐवजी १३० बेड सुरू ठेवून उर्वरित टीबी इमारतीतील बेड बंद ठेवण्यात आले. मात्र, मागील दीड महिन्यापासून पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. तर, गेल्या दोन दिवसांपासून रुग्णांची संख्या तीन हजारांच्या पार गेली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण सेवा बंद केलेल्या १७० बेड पुन्हा रुग्ण सेवेसाठी सुरू करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे. गेल्या चार महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयातील ३०० पैकी १३० बेडवरच रुग्ण सेवा सुरू ठेवण्यात आली होती.
ग्रामीण भागाचा भार जिल्हा शासकीय रुग्णालयावर
- जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील कोरोना केंद्रे बंद करण्यात आली होती. मात्र, आता रुग्ण वाढत असून, या तालुक्यांत केंद्र नसल्याने तेथील रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी यावे लागत आहे. त्यामुळे या रुग्णालयावर त्या रुग्णांचा भार पडत आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाकडून या तालुक्यांतील केंद्रे पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- दुसरीकडे ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा-भाईंदर, नवी मुंबई या शहरांत एकूण ११७ कोरोना अतिदक्षता केंद्रे आहेत. मात्र, ठाणे ग्रामीण क्षेत्रात सध्या एकही अतिदक्षता केंद्र नसल्याने येथील रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे.
-------------