टीडीसीसी बँकेला १५५ कोटींचा करपूर्व नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:38 AM2021-04-13T04:38:49+5:302021-04-13T04:38:49+5:30
ठाणे : कोरोनामुळे अर्थव्यवस्था अडचणीत असताना ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेने २०२०-२१ या वर्षातही प्रगतीचा आलेख उंचावत ठेवून ...
ठाणे : कोरोनामुळे अर्थव्यवस्था अडचणीत असताना ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेने २०२०-२१ या वर्षातही प्रगतीचा आलेख उंचावत ठेवून करपूर्व १५५ कोटींचा नफा मिळवून व्यवसायात एक हजार ८ कोटींची वाढ केली, असे बँकेचे विद्यमान व नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले.
मार्चअखेर बँकेचा संमिश्र व्यवसाय ११ हजार ६८२ कोटींचा झाला आहे. गतवर्षाच्या तुलनेत संमिश्र व्यवसायात १००८ कोटींची वाढ झाली. बँकेच्या ठेवी आठ हजार ८५ कोटी झालेल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत ठेवीमध्ये ७६५ कोटींची वाढ झालेली आहे. बँकेची वर्षअखेर एकूण कर्जे तीन हजार ५९७ कोटी आहेत. या कर्जात एकूण २४३ कोटीने वाढ झाली आहे. बँकेची गुंतवणूक पाच हजार ३३८ कोटी झाली आहे. यामध्ये ५८० कोटींची वाढ झाली असल्याचे पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
- सर्वांना एक वर्षाची संधी
जिल्हा बँकेच्या २१ संचालकांपैकी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांचे कट्टर समर्थक सत्ताधारी सहकार पॅनलचे नऊ संचालक आणि भाजपचे सात आणि अन्य दोन आदी १८ संचालक आहेत. यास अनुसरून भाजप आमदार किसन कथोरे यांनी स्पष्ट केले की, आम्ही सर्व मित्रपक्षांनी निर्णय घेऊन सत्ताधारी संचालकांना एक वर्षासाठी अध्यक्ष, उपाध्यक्षपदी संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. सहकाराच्या एक विचारातून बँक चालावी हा महत्त्वाचा हेतू आहे. राज्यात बँक आदर्श व्हावी हा खऱ्याअर्थाने आमचा उद्देश, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
---------------------