ठाण्याच्या टीडीआरएफच्या जवानांनी वाचविले बुडणाऱ्या दोघांचे प्राण
By जितेंद्र कालेकर | Published: July 19, 2023 04:22 PM2023-07-19T16:22:38+5:302023-07-19T16:25:10+5:30
उपवन भागात टीडीआरएफच्या जवानांना विकी आणि अजय हे दोघे उपवन तलावात बुडताना आढळले.
ठाणे: ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या (टीडीआरएफ) जवानांनी विकी माधव पुजारी (२६, रा. गांधीनगर, ठाणे) आणि अजय किसन वाल्मीकी (३०, रा. गांधीनगर, ठाणे ) या पाण्यात बुडणाºया दोघांचे प्राण वाचविल्याची घटना दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास समोर आली. टीडीआरएफच्या जवानांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे त्यांचे कौतुक होत आहे.
उपवन भागात टीडीआरएफच्या जवानांना विकी आणि अजय हे दोघे उपवन तलावात बुडताना आढळले. तात्काळ क्षणाचाही विलंब न करता जवान प्रशांत बोंबे, संदेश घोडे आणि प्रतीक पाटील या तिघांनीही पाण्यात उडया मारुन दोघांचेही प्राण वाचविले. त्यांना जवान चेतन तरोळे , संकेत पाटील ,अमोल दराडे आणि सतीश पाटील यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. त्यांना वर्तकनगर पोलिस ठाण्याचे बिट मार्शल दरेकर आणि गावीत यांच्या ताब्यात देण्यात आले.
विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी याच उपवन तलावात पोहतांना दम लागल्यामुळे एका बारावीतील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच बुधवारी पाण्यात बुडणाºया दोघांना टीडीआरएफची तातडीने मदत मिळाल्यामुळे दोघांचेही प्राण वाचल्याची माहिती सूत्रांनी दिली.