आपत्तीसाठी टीडीआरएफची टीम सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 02:20 AM2018-05-24T02:20:45+5:302018-05-24T02:20:45+5:30
मे अखेर ठामपात रुजू : ठाण्यात तळ ठोकण्यास एनडीआरएफचा नकार
ठाणे : येत्या मान्सूनच्या काळात एखादी दुर्घटना घडली तर त्याचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या टीडीआरएफची (ठाणे आपत्ती प्रतिसाद दल) टीम सज्ज झाली आहे. येत्या मे अखेर ती महापालिकेत रुजू होणार आहे. एनडीआरएफने ठाण्यात तळ ठोकण्यास नकार दिल्याने आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणे महापालिकेमार्फतच अशा प्रकारची टीम तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आता ती सज्ज झाली आहे.
महापालिका हद्दीत दरवर्षी पावसाळ्यात दुर्घटना घडत आहेत. आता हे प्रमाण कमी झाले असले तरी मान्सूनच्या काळात एखादी आपत्ती घडल्यास मदतीसाठी एनडीआरएफला पाचारण करावे लागत होते. परंतु, एनडीआरएफच्या टीमने ठाण्यातच वास्तव्य करावे, यासाठी ठामपाचे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी घोडबंदर भागात त्यांची व्यवस्थाही केली जाणार होती. परंतु, या टीमने येण्यास नकार दिल्याने अखेर आपत्तीच्या काळात मदतीला येऊ शकेल, अशी टीम तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार, आता टीडीआरएफ या टीमची रचना केली आहे. आयुक्तांच्या निर्णयानुसार यंदाच्या पावसाळ्यापूर्वी हे पथक तयार करण्यासाठी महापालिका प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. मे महिन्याच्या अखेरपर्यंत हे पथक तयार करून त्यांची परिमंडळस्तरावर नेमणूक करण्याचा प्रशासनाचा विचार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे महापालिका मुख्यालय आणि तीन परिमंडळे अशा ठिकाणी ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक तैनात केले जाणार आहे. एका पथकामध्ये एक अधिकारी आणि २० कर्मचारी असणार आहेत. त्यामध्ये सैन्य दल आणि पोलीस दलातील भरतीमध्ये पात्र ठरलेले पण, जागेअभावी प्रतीक्षा यादीमध्ये असलेल्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या पथकाला आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच आपत्ती निवारणासाठी लागणारी यंत्रणा असलेल्या कंपनीची निवड करून त्यांच्याकडून ही सामग्री उपलब्ध करून घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे सैन्य आणि पोलीस दलातून निवृत्त झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची या पथकामध्ये समन्वयक म्हणून निवड केली जाणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
यंदाच्या पावसाळ्यात ५० दिवस धोक्याचे
ठाणे : मान्सूनच्या काळात कोणत्याही प्रकारची आपत्ती ओढवल्यास आपत्ती व्यवस्थापनासह पालिकेच्या इतर अधिकारी, कर्मचाºयांनीदेखील सतर्क राहावे, असे आदेश बुधवारी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले. यंदा पावसाचे आगमन लवकर होणार असून या वर्षीचा पावसाळा ५० दिवस उधाणाचा असणार आहे. तसा इशाराच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने भरतीचे वेळापत्रक प्रसिद्ध करून दिला आहे.
१ जूनपासूनच ठाण्याच्या खाडीमध्ये चार मीटरपेक्षा जास्त उंचीचे उधाण येणार असून चार महिन्यांमध्ये सर्वात मोठी ४.६२ मीटर उंचीची भरती १४ जुलैला येणार आहे. भरतीच्या काळामध्ये ठाणेकरांनी सावधानता बाळगावी, असे आवाहनही ठाणे महापालिकेने केले आहे. मागील वर्षीच्या मान्सूनच्या काळात १०६ दिवसांमध्ये १७८ वेळा भरती आली होती. यंदा उधाणाचे दिवस कमी झाले असले तरी ठाण्याला धोका कायम आहे.
विस्तीर्ण खाडीकिनारा लाभल्यामुळे भरतीच्या दिवशी मुसळधार पाऊस झाला, तर त्याचा परिणाम जाणवतो. गेल्या वर्षी भरतीच्या दिवशी झालेल्या पावसामुळे ठाण्यात एकाच दिवशी तिघे वाहून गेले होते. या घटनेची पुनरावृत्ती घडू नये, यासाठी पालिका प्रशासन सतर्क झाले असून १८००२२२१०८ ही टोल फ्री हेल्पलाइन सुरू केली आहे. याशिवाय २५३७१०१०, २५३७४५७८, २५३७४५७९, २५३९९८२८ आदी क्र मांक २४ तास ठाणेकरांसाठी उपलब्ध केले आहेत.
कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती ओढवल्यास या क्र मांकावर संपर्क साधून अथवा एसएमएसद्वारे माहिती देऊ शकता. माहिती मिळताच आपत्तीचे पथक बचावकार्य व मदतीसाठी हजर असेल, असे या विभागाचे प्रमुख संतोष कदम यांनी सांगितले. या कक्षासाठी नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचाºयांनी पावसाळ्यात २४ तास मोबाइल सुरू ठेवण्याचे आदेश जयस्वाल यांनी दिले. ज्या अधिकारी, कर्मचाºयांचे मोबाइल नॉट रिचेबल असतील. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची तंबी दिली.