चहालाही आली दरवाढीची उकळी; गॅस, दूध भाववाढीचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 12:11 AM2020-02-24T00:11:18+5:302020-02-24T06:56:43+5:30
चहा एक ते दोन रुपयांनी महागला
- पंकज रोडेकर
ठाणे : मागील सहा वर्षांत चहाचे दर वाढले नसले तरी यंदा गॅस आणि दुधाच्या दरात मोठी वाढ झाल्याने चहाचा घोट महागला आहे. गॅस सिलिंडरपाठोपाठ दुधाच्या भाववाढीमुळे चहावाल्यांनीसुद्धा भाववाढ केल्याने एक कटिंग चहामागे दोन रूपयांची वाढ केली आहे. मागील सहा वर्षांतील ही पहिलीच वाढ असल्याचा दावा चहावाल्यांकडून केला जात आहे. त्यातच, वेगवेगळ्या नावाने ब्रॅण्डिंग सुरू केलेल्या ‘अमृततुल्य’ चहाच्या दुकांनावर एका कटिंगसाठी दहा रुपये मोजणाऱ्यांची गर्दी दिसते. त्यामुळे महागाई आणि आर्थिकमंदीतही चहाचे मार्केट मात्र गरमच दिसत आहे.
चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा हवाच. चहा विक्री करणाºया एका कंपनीचे हे वाक्य भारतीयांसाठी चहा किती प्रेमाचा आहे याची प्रचिती देते. म्हणूनच नाक्यानाक्यावर चहाच्या टपºया दिसतात. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच चहाची गोडी आहे. त्यामुळे या व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल होते. देशात आर्थिकमंदी असो वा महागाई, चहाच्या व्यवसायावर फारसा परिणाम दिसत नाही. पूर्वी ज्या चहाची कटिंग अवघ्या पन्नास पैशाला मिळायची, ती आता दहा रुपयांवर पोहोचली आहे. तरीही चहाचे चाहते कमी झालेले नाहीत. कडक उन्हाळा असो, पावसाळा असो, वा हिवाळा, लोकांना चहा हवाच असतो. म्हणूनच रस्त्यावरची ही लहान इंडस्ट्री दिवसेंदिवस फुलतच आहे. सध्या या इंडस्ट्रीला गॅस आणि दुधाच्या भावाढीचे ग्रहण लागले आहे. गेल्या सहा महिन्यांत गॅसचे भाव गगनाला भिडले आहेत. सहा महिन्यांपूर्वी जे गॅस सिलिंडर ७००-८०० रुपयांना मिळत होते, ते आता १४२० रुपयांना मिळत आहे. जे दूध सहा महिन्यांपूर्वी ४०-४५ रुपये लिटरने मिळत होते, ते आता ६० रुपये लिटरने मिळत आहे. दूध आणि गॅसचा भाव सहा वर्षांत अनेकदा वाढला. परंतु चहाच्या कटिंगचा भाव वाढला नव्हता. आता मात्र भाववाढ करणे अपरिहार्य झाल्याचे कारण पुढे करत विक्रेत्यांनी कटिंगमागे रुपयाची वाढ केली आहे. लहान टपऱ्यांवर एरव्ही सहा रुपयांना मिळणारी कटिंग चहा आता सात रु पये झाली आहे. स्पेशल फुल चहा १८ रुपयांवरून २० रुपये झाला आहे. साधा फुल चहा १२ वरून १४ रुपये झाला आहे. भाव वाढले तरी ग्राहक कमी झाले नसल्याचे चहाविक्रेत्यांनी सांगितले.
गेल्या सहा महिन्यांपासून गॅस सिलिंडरचे भाव सतत वाढत आहेत. तरीही चहाच्या भावात वाढ झालेली नव्हती. मात्र आता गॅस आणि दुधाच्या किंमतीत पुन्हा वाढ झाल्याने चहाच्या किमतीत वाढ करावी लागली. १ फेब्रुवारीपासून काही ठिकाणी भाववाढ झाली असून काही जण १ मार्चपासून भाववाढ करणार आहेत.
-शंकर यादव, चहा विक्रेता, कोपरी, ठाणे
गेल्या सहा महिन्यांत गॅस आणि दुधाच्या दरांमध्ये कमालीची वाढ झाली आहे
सिलिंडर
सहा महिन्यांपूर्वी आता
800 1420
दूध
सहा महिन्यांपूर्वी आता
45 60