चहा पावडर भेसळयुक्त असल्याचे सिद्ध, एफडीएची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 03:25 AM2019-02-09T03:25:49+5:302019-02-09T03:26:14+5:30

घाईगडबडीत टपऱ्यांवर चहा घेत असाल, तर ठाणेकरांनो सावधान!

Tea powder is proven to be adulterated, FDA information | चहा पावडर भेसळयुक्त असल्याचे सिद्ध, एफडीएची माहिती

चहा पावडर भेसळयुक्त असल्याचे सिद्ध, एफडीएची माहिती

googlenewsNext

ठाणे : घाईगडबडीत टपऱ्यांवर चहा घेत असाल, तर ठाणेकरांनो सावधान! कारण, डिसेंबर महिन्यात ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) ठाण्यातील वाघेला आणि ठक्कर या दोन चहाविक्रेत्यांच्या दुकानांमधून घेतलेल्या चहा पावडरच्या नमुन्यांमध्ये भेसळ आणि पॉकिंगमध्ये दिशाभूल केल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.

ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेतील वाघेला चहा दुकानावर ठाणे एफडीएचे सहआयुक्त (कोकण) शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त राजेंद्र रूणवाल यांच्या पथकाने ८ डिसेंबर रोजी केलेल्या कारवाईत ६३७.५०० किलो चहा पावडर जप्त केली होती. त्यावेळी बंद आणि खुल्या चहा पावडरचे नमुने घेतले होते. त्यानंतर १० डिसेंबरला वाघेला यांच्या गोदामावर छापा टाकून पुन्हा ३२६ किलोचा साठा जप्त केला. त्यावेळीही तेथून दोन नमुने घेतले होते. याचदरम्यान १२ डिसेंबरला ठाण्यातील महागिरी येथील ठक्कर टी या दुकानावर आणि गोदामावर छापा टाकून दोन्ही ठिकाणांहून ५१५ किलो चहा पावडरचा साठा जप्त केला होता. तेथूनही प्रत्येकी दोनदोन नमुने घेतले होते. या दोन्ही कारवाईतील नमुने तपासणीसाठी बांद्रा येथील एफडीएच्या प्रयोगशाळेत पाठवले होते.

त्याचा अहवाल ४ फेब्रुवारी रोजी ठाणे एफडीए विभागाला मिळाला. त्यामध्ये वाघेला आणि ठक्कर यांच्या जप्त केलेल्या मुद्देमालात भेसळ झाल्याचे नमूद केले आहे. पॅकिंग ब्रॅण्डवरही दिशाभूल केल्याचे म्हटले आहे. त्यानुसार त्या दोन्ही दुकानांवर एफडीए कायद्यानुसार न्यायनिर्णय न्यायालयासमोर खटला दाखल करण्याची कारवाई आता सुरू झाली आहे. एफडीएच्या कायद्यामध्ये भेसळप्रकरणी चार लाख, तर दिशाभूल केल्याप्रकरणी १० लाखांच्या दंडाची तरतूद असल्याची माहिती ठाणे अन्नसुरक्षा अधिकारी धनश्री ढाणे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

कारवाईत चार लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
वाघेला दुकान आणि गोदाम येथे केलेल्या कारवाईत दोन लाख ८८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल
जप्त केला आहे. त्यानंतर, ठक्कर टी दुकान आणि गोदामातून एक लाख ५२ हजार ७८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या रंगाचे प्रमाण आढळले
नमुन्यांची तपासणी केल्यावर चहा पावडरमध्ये टार्टराजीन आणि सनसेट येलो या रंगांचे प्रमाण आढळून आले आहे. चहा पावडरमध्ये रंग वापरण्यास मनाई असताना, त्यामध्ये कृत्रिम खाद्यरंग वापरण्यात आले आहे. तसेच पॅकिंग करताना त्यावर दिशाभूल केल्याचे अहवालात म्हटले आहे.

Web Title: Tea powder is proven to be adulterated, FDA information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.