शिक्षकाचा पुढाकार; लोकवर्गणीतून उभारली भव्य शाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 07:07 PM2021-08-17T19:07:15+5:302021-08-17T19:08:24+5:30
भिवंडीतील मालोडी जिल्हा परिषद शाळा इमारतीचे उदघाटन...
भिवंडी - सध्या इंग्रजी माध्यमाच्या उच्चभ्रू शाळांमुळे जिल्हा परिषद व शासकीय शाळा पटसंख्येत मागे पडत आहेत. असे असतानाच जिल्हा परिषदेच्या एक वर्ग खोलीची शाळा बनविण्यासाठी जिल्हा परिषदेने मान्यता दिल्यानंतर, शाळेतील शिक्षकाने पुढाकार घेत लोकवर्गणीतून सुंदर व सुबक एक मजली शाळा उभारली. या शाळेत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व वर्ग खोल्यांच्या भिंतींवर सुंदर चित्र रेखाटले आहेत. (Teacher initiative; A magnificent school built With the participation of the people)
या शाळा इमारतीचा उद्घाटन सोहळा हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या हस्ते जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार शांताराम मोरे, जिप उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडला .
भिवंडी तालुक्यातील मालोडी या गावात जिल्हा परिषदेने एक वर्ग शाळा मंजूर केली होती. परंतु या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असणारे ज्ञानेश्वर काठे यांनी पुढाकार घेत ग्रामस्थांना विश्वासात घेऊन लोकवर्गणी एकत्र करीत शाळा एकमजली बनविण्याचा निर्णय घेऊन न थांबता तो संकल्प तडीस नेला. तसेच या शाळेच्या वर्गखोल्यात अभ्यासपूर्ण चित्र रंगवून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नांची सर्वच ग्रामस्थांसह मान्यवरांनी प्रशंसा केली आहे. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मोनिका चौधरी व ग्रामस्थांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले, तर मान्यवरांच्या हस्ते शिक्षक ज्ञानेश्वर काठे यांचा गौरव करण्यात आला .
सध्याच्या कोरोना काळात मागील दीड वर्ष शाळा बंद असतानाही शिक्षकांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न केले. त्याच बरोबर या शाळेचे शिक्षक ज्ञानेश्वर काठे यांनी शाळा इमारत घडविण्यासाठी जे कष्ट घेतले त्यांचा उचित सन्मान, समाजा सोबतच शासनानेही करणे गरजेचे आहे.अशा ध्येयवेड्या शिक्षकांमुळेच जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याचे प्रतिपादन यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केले.