शिक्षक गायब, विद्यार्थीच शिक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 05:55 AM2017-08-10T05:55:42+5:302017-08-10T05:55:42+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या शिक्षण विभागातील आणखी एक अनागोंदी चव्हाट्यावर आली आहे. पालिकेच्या भार्इंदर येथील हिंदी शाळा सुरु असताना शिक्षक गायब, तर विद्यार्थीच वर्गात मुलांना शिकवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या शिक्षण विभागातील आणखी एक अनागोंदी चव्हाट्यावर आली आहे. पालिकेच्या भार्इंदर येथील हिंदी शाळा सुरु असताना शिक्षक गायब, तर विद्यार्थीच वर्गात मुलांना शिकवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
मीरा-भार्इंदर महापालिकेचा शिक्षण विभाग व त्यातील अनागोंदी ‘लोकमत’ने ‘भूमिका’ या सदराखाली मांडल्यानंतर अनेक गैरप्रकार समोर येऊ लागले आहेत. भार्इंदर पश्चिमेच्या पालिकेच्या सकाळच्या हिंदी शाळा क्र. ३० मधील चौथ्या मजल्यावरील वर्गाच्या पाहणीदरम्यान धक्कादायक प्रकार आढळून आले. तेथे मुख्याध्यापक अरुण सिंह शाळेतच नव्हते. शाळा सुरु असताना वर्गातील मुलांना वाºयावर सोडून सिंह यांच्यासह चौथी अ व ब या तुकडीचे शिक्षक अनिल मिश्राही त्यांच्यासोबत गेले होते. आॅफिसच्या बाजूच्या ७ वी अ या वर्गाचे शिक्षक सुनिल तिवारी हे काही कारणास्तव आले नसल्याने तेथे ७ वी ब चे शिक्षक शशीभुषण तिवारी हे आपला वर्ग सोडून तेथे शिकवत होते. त्या सदर वर्गातच स्वत:चा ३ रीचा वर्ग असलेल्या ममता यादव या शिक्षिकाही बसल्या होत्या.
७ वी ब च्या वर्गात तर चक्क एक विद्यार्थीच वर्ग चालवत होता व मुलांना शिकवत होता, तर ४ थी अ व ब तसेच ३ रीच्या वर्गातील विद्यार्थीही वाºयावरच होते.
शशीभूषण हे अधूनमधून ७ वी ब व ४ थीच्या वर्गात जाऊन हातातील लाकडी पट्टी उगारुन विद्यार्थ्यांना ओरडून दम देत होते आणि शांत बसा, नाहीतर मारेन असे बजावत होते.
मुख्याध्यापक व अन्य वर्गात शिक्षक नसल्याबद्दल शशीभूषण यांनी सांगितले, मुख्याध्यापक व अन्य एक शिक्षक बँकेत कामासाठी गेले आहेत. किती वेळ लागेल, ते सांगता येत नाही. पण दुपारी शाळा सुटेपर्यंत ते आले नाहीत.
अधिकाºयांचे दुर्लक्ष नि लोकप्रतिनिधींचेही
पालिका, सरकार विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या-पुस्तके, बूट, दप्तर आदी फुकट देते. शिक्षकांना पगार चांगले आहेत. पण मुख्याध्यापक व शिक्षक नेमके काय काम करतात? विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देतात का? वर्गात हजर असतात का? याकडे पालिकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी सर्रास दुर्लक्ष करतात. वरिष्ठांच्या आशीर्वादामुळे काही शिक्षक वर्गात उपस्थित नसतात. खाजगी कामे करतात किंवा एकत्र बसून चकाट्या पिटतात. अनेकदा तास भरायचे म्हणून शिकवतात, अशा तक्रारी पालकांनी केल्या.
वरिष्ठांसाठी वसुली? : अनिल आगळे या लाचखोर शिक्षकाला वाढीव वेतनश्रेणीसाठी शिक्षिकेकडून पाच हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक झाल्याने खळबळ उडाली. त्यामुळे शिक्षकांच्या बदल्या, पदोन्नती, वाढीव वेतनश्रेणीसह अनेक प्रकरणात अर्थपूर्ण व्यवहार होत असल्याची चर्चा रंगली. काही अधिकारी हे वरिष्ठांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्यासाठी वसुली करत असल्याचे सांगितले जाते. आगळे हाही शिक्षण विभागाच्या अधिकाºयांच्या जवळचा मानला जातो.