ठाण्यातील शिक्षकाने सुरू केली कोरोना रुग्णांसाठी मोफत वाहनसेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 11:24 PM2021-05-05T23:24:06+5:302021-05-05T23:24:27+5:30

आतापर्यंत ४२ रुग्णांना लाभ : तातडीने उपचारांसाठी पुढाकार

A teacher from Thane started a free transport service for Corona patients | ठाण्यातील शिक्षकाने सुरू केली कोरोना रुग्णांसाठी मोफत वाहनसेवा

ठाण्यातील शिक्षकाने सुरू केली कोरोना रुग्णांसाठी मोफत वाहनसेवा

googlenewsNext

जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची होणारी बिकट अवस्था, वेळेत उपचार आणि रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे होणारे मृत्यू तसेच अनेकदा रुग्णवाहिका चालकांकडूनही होणारी अडवणूक लक्षात घेऊन ठाण्यातील खासगी क्लास चालविणाऱ्या विनय सिंग या शिक्षकाने स्वत:च्या मोटारीचा कोरोना रुग्णांसाठी वापर सुरू केला आहे. ही संपूर्ण सेवा ते विनामोबदला देत आहेत. आतापर्यंत ४० ते ४२ रुग्णांना ही सेवा दिल्याचे सिंग यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या रुग्णाला रिक्षा किंवा इतर वाहन मिळणे अवघड हाेते. संसर्गजन्य आजार असल्यामुळे दुचाकीवरूनही कोणी रुग्णालयापर्यंत सोडण्यास तयार होत नाही. अशा वेळी त्याला एकतर स्वत:चे वाहन न्यावे लागते किंवा रुग्णवाहिकेची वाट पाहावी लागते. पहिल्या लाटेत अनेकांना रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने जीव गमवावा लागला हाेता. दुसऱ्या लाटेतही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे अनेकांना रुग्णवाहिका मिळण्यात अडचणी येतात.  रुग्णवाहिकाचालकांकडून जेथे एक हजार ते १२०० रुपयांच्या जागी चार ते पाच हजार रुपये उकळले जातात. या सर्व बाबी लोकमान्यनगर येथील रहिवासी शिवशांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा एका खासगी क्लासचे संचालक विनय सिंग यांच्या निदर्शनास आल्या. यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी २७ एप्रिल २०२१ पासून स्वत:च्या माेटारीचा काेराेना रुग्णांसाठी नि:शुल्क वापर सुरू केला. त्यांना रोज किमान चार ते पाच फोन या सेवेसाठी येतात. आतापर्यंत त्यांच्या वाहनाने ४२ कोरोना रुग्णांना रुग्णालयापर्यंत नेल्याबाबत ते समाधान व्यक्त करतात. मृतदेह नेण्यासाठी ही सुविधा नसल्याचे ते सांगतात. या खासगी वाहनाच्या चालकाचा आणि सीएनजीचा खर्चही ते स्वत: करत आहेत. या रुग्णांची सेवा करून आपल्याला  ईश्वरसेवा केल्याचे समाधान मिळत असल्याचे सिंग यांनी सांगितले.

वाहनामध्ये खास सुविधा
विनय यांनी आपल्या वाहनात प्लास्टिकचे पार्टिशन करून घेतले आहे. ऑक्सिजनची गरज नसलेल्या रुग्णांना ही सेवा देण्यात येत असून विनय आणि त्यांचे चालक धनंजय सिंग हे पीपीई किट घालून ही सेवा देतात. त्यांच्या रुग्णसेवेबाबत नागरिकांमधून काैतुक केले जात आहे.

कोरोना रुग्णांना रुग्णवाहिका मिळवताना अडचणी येतात. अगदी लोकमान्यनगर ते मानपाडा जाण्यासाठीही चार ते पाच हजारांची रक्कम घेतल्याच्या तक्रारी आल्या. त्या वेळी मोफत वाहन देण्याचा विचार मनात आला आणि तो अमलात आणला.
    - प्रा. विनय सिंग, 
    अध्यक्ष शिवशांती प्रतिष्ठान, ठाणे

 

Web Title: A teacher from Thane started a free transport service for Corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे