गणित सोडवताना हाच्चा दिला नाही म्हणून सहावीच्या विद्यार्थिनीला शिक्षिकेची मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 10:34 PM2018-03-12T22:34:47+5:302018-03-12T23:05:35+5:30
मीरा भार्इंदर महापालिकेच्या मुर्धा गावातील मराठी शाळेत एका सहावीच्या विद्यार्थिनीने हाच्चा दिला नाही म्हणून शिक्षिकेने काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भार्इंदर पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
मीरारोड : मीरा भार्इंदर महापालिकेच्या मुर्धा गावातील मराठी शाळेत एका सहावीच्या विद्यार्थीनीने हाच्चा दिला नाही म्हणून शिक्षिकेने काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भार्इंदर पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
मुर्धा गावात महापालिकेची मराठी शाळा असून सदर शाळेत शिकणारी ११ वर्षाची विद्यार्थिनी ही ६ वी इयत्तेत शिकते. सकाळी ११ ते सायंकाळी ५ अशी शाळेची वेळ आहे. आज सोमवारी नेहमीप्रमाणे ही विद्यार्थीनी शाळेत गेली. दुपारी वर्ग शिक्षिका सायली पिंपळे या गणिताची चाचणी घेत होत्या. त्यावेळी फळ्यावर गणित सोडवण्यास सदर विद्यार्थिनीस सांगितले असता भागाकार करताना हाच्चा लिहायाचे राहिले जेणे करुन संपूर्ण गणित चुकले. याने संतप्त झालेल्या पिंपळे यांनी काठी विद्यार्थिनीच्या दंडावर जोरात मारली. तसेच तिच्या डोक्यावर देखील मारहाण केली.
शाळा सुटेपर्यंत ती विद्यार्थिनी वर्गात हात दुखत असताना देखील तशीच बसून होती. तिच्या दंडावर मारहाणीमुळे मोठा व्रण आला होता. सायंकाळी शाळा सुटल्यावर मुलगी घरी गेली असता घडला प्रकार आईला कळला. अखेर पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. त्या शिक्षिकेस आम्ही पोलीस ठाण्यात बोलावले असून चौकशीनंतर पुढील कार्यवाहीचे ठरेल असे पोलीस सुत्रांनी सांगितले.