शिक्षकांची मुले मात्र शिकतात खाजगी शाळेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 02:42 AM2019-04-21T02:42:50+5:302019-04-21T02:43:30+5:30
मुंब्रा, दिव्यातील मोजक्याच शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी संगणक आहेत. परंतु ते शिकवण्यासाठी शिक्षक नाही.
- कुमार बडदे
मुंब्रा, दिव्यातील मोजक्याच शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी संगणक आहेत. परंतु ते शिकवण्यासाठी शिक्षक नाही. तसेच संगणक लॅबदेखील नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभावानेच संगणकाचे ज्ञान मिळते, अशी माहिती एका शिक्षकानेच दिली. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांची वर्णी या परिसरातील शाळांमध्ये लावल्याने ठामपा शाळांमधील शिक्षकांची समस्या काहीशी हलकी झाली आहे. ठामपा शाळांमध्ये शिकण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा यासाठी जनजागृती मोहिमा राबवल्या जातात. या मोहिमांमध्ये सहभागी होणाऱ्या तसेच ठामपा शाळेत शिकवत असलेल्या बहुतांशी शिक्षकांची मुले मात्र खाजगी शाळांमध्ये शिकत असल्याची माहिती एका खाजगी शाळेच्या शिक्षकाने दिली.
या परस्पर विरोधाभासामुळे महापालिका शाळेतील शिक्षणाच्या दर्जावर सर्वसामान्यांनी विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न समाजसेवक फैसल चौधरी यांनी उपस्थित केला. ठाणे महापालिका हद्दीत असलेल्या शाळांचे प्रभागनिहाय गट करण्यात आले आहेत. त्यानुसार असलेल्या ८ गटासाठी फक्त दोनच गटाधिकारी आहेत. ते प्रत्येकी चार शाळांच्या कारभारावर लक्ष ठेवतात यामुळे त्यांच्या कामावर मर्यादा येतात. त्यांना त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व शाळांवर व्यवस्थित लक्ष केंद्रीत करता येत नसल्याची खंत एका शिक्षकाने व्यक्त केली.
नूतनीकरणानंतर सुरु करण्यात आलेल्या कौसा भागातील शाळेत सध्या इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरु आहेत. या शाळेच्या बाजूने वहात असलेल्या गटाराच्या संरक्षक भिंतीची उंची वाढवण्यात आली आहे. यामुळे तळमजल्यावरील वर्गामध्ये अंधार पसरतो. या नाल्यामधील असाह्य दुर्गंधीमुळे विद्यार्थी आणि शिक्षक त्रस्त आहेत.या शाळेच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. मुंब्रा बाजारपेठेतील शाळेच्या एका बाजूने असलेल्या रहिवासी इमारतींमुळे वीज गेल्यावर वर्गामध्ये अंधार पसरतो. अशावेळी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर लादीवर बसून ज्ञानार्जन करावे लागते. विद्यार्थ्यांचा शैक्षणिकदर्जा उंचावा तसेच त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा, यासाठी बहुतांश शाळांमध्ये वार्षिक स्नेहसंम्मेलने तसेच विविध क्रीडास्पर्धाचे आयोजन केले जाते. कौसा स्टेडियमसमोरील एकाच इमारतीमध्ये विविध माध्यमांच्या १२ शाळा भरतात. या शाळा मुख्य रस्त्यापासून लांब आहेत. यामुळे या शाळांची पटसंख्या कमालीची घसरली आहे. या शाळांपर्यत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना आणि पालकांना कराव्या लागणाºया पायपिटीपासून त्यांची सुटका व्हावी.
यासाठी या शाळांपर्यत बस सुरु करण्याचा किंवा खिडकाळी मार्गावर धावणाºया काही बसगाड्या शाळेच्या मार्गे वळविण्याबाबत विचारविनिमय दोन वर्षापूर्वी सुरु होता. परंतु ही योजना मूर्त स्वरु पात आली नाही. खाजगी शाळांमध्ये नाव दाखल करण्याची प्रक्रिया जानेवारी महिन्यात सुरू होते. महापालिका शाळामध्ये मात्र ती नवीन शैक्षणिक सत्र सुरु झाल्यानंतर जूनमध्ये सुरू होते. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी इतर शाळांमध्ये प्रवेश घेतलेला असतो.
यामुळे महापालिकेच्या शाळांमध्ये येणाºया नवीन विद्यार्थ्यांची संख्या नगण्य आहे. यामुळे या शाळांची पटसंख्या वाढत नाही. महापालिकेच्या शाळांमध्ये नवीन दाखला देण्याची प्रक्रिया काही महिने अगोदर सुरु केली, तसेच एकाच इमारतीमध्ये असणाºया अनेक शाळांचे विभाजन करून त्या खाजगी शाळांप्रमाणे ठिकठिकाणी (प्रभागांमध्ये) सुरु केल्यास पटसंख्या निश्चित वाढेल, असा विश्वास जाहिद सय्यद या मुख्याध्यापकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.
ठाणे महापालिकेच्या हद्दीतील मुंब्रा येथे अचानकनगर, मुंब्रादेवी रोड, रेतीबंदर, कौसा, शीळ, मोठी देसाई, डायघर, फडकेपाडा, वेताळपाडा याचप्रमाणे दिव्यातील दिवागाव, साबेगाव, म्हातार्डी, आगासन, दातिवली येथे महापालिकेच्या एकून ४२ शाळा आहेत. यामध्ये मराठी माध्यमाच्या प्राथमिक विभागाच्या १९ तसेच माध्यमिक विभागाच्या दोन, उर्दू माध्यमाच्या प्राथमिक विभागाच्या १६ तसेच माध्यमिक विभागाच्या दोन याप्रमाणे इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक विभागाच्या दोन आणि गुजराथी माध्यमाच्या प्राथमिक विभागाच्या एका शाळेचा समावेश आहे.
यामध्ये नुकत्याच संपलेल्या २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात १२ हजार ४६९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये ६ हजार ९१ विद्यार्थी आणि ६ हजार ३७८ विद्यार्थिनींचा समावेश होता. वरील शाळांपैकी मुंब्रा बाजारपेठ तसेच कौसा स्टेडियमसमोरील शाळांमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांना कवायत तसेच इतर मैदानी खेळ खेळण्यासाठी इतर शाळांच्या तुलनेत प्रशस्त मैदाने आहेत.
परंतु इतर शाळांमध्ये मात्र प्रशस्त मैदानांची वानवा आहे. यामुळे त्या शाळांमधील विद्यार्थ्यांना कवायती तसेच इतर मैदानी खेळ शिकवताना शिक्षकांना अडचणी येतात. दि २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन आणि दि. १५ आॅगस्टला स्वातंत्र्य दिन दोन्ही सत्रातील विद्यार्थ्यांना एकत्र आणून साजरा करता येत नाही.