जिल्ह्यातील शिक्षक ऑक्टोबरच्या पगारापासून वंचितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 11:02 PM2019-11-19T23:02:57+5:302019-11-19T23:03:03+5:30

शिक्षकांची झाली अडचण : दिवाळीपूर्वी शासन देणार होते पगार

Teachers in the district deprived of the October salary | जिल्ह्यातील शिक्षक ऑक्टोबरच्या पगारापासून वंचितच

जिल्ह्यातील शिक्षक ऑक्टोबरच्या पगारापासून वंचितच

Next

पालघर : जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक ऑक्टोबर महिन्याच्या पगारापासून अद्याप वंचित असून, शिक्षकांना मोठ्या आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. दिवाळीपूर्वी, २५ ऑक्टोबरपर्यंत ऑक्टोबर महिन्याचा पगार देण्याचे शासनाने जाहीर केले होते. वेळेत पगार न झाल्याने शिक्षकांना उसनवारी करून दिवाळी साजरी करण्याची वेळ आली.

यावर्षी आॅक्टोबर महिन्याच्या अखेरीस दिवाळी आल्याने आॅक्टोबरचा पगार २० आॅक्टोबरपर्यंत देण्याचे राज्य शासनाने प्रथम जाहीर केले. परंतु राज्यातील सर्व कर्मचारी यंत्रणा विधानसभा निवडणुकीत व्यस्त असल्याने शासनाने हा आदेश रद्द करून दिवाळीपूर्वी वेतन अदा करण्यास असमर्थता दर्शवली. राज्यभरातील कर्मचारी संघटनांच्या दबावामुळे पुन्हा परिपत्रक काढून दिवाळीपूर्वी राज्यातील कर्मचाऱ्यांना आॅक्टोबर महिन्याचा पगार अदा करण्याचे सर्व विभागांना आदेश दिले.

परंतु पालघर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक अद्यापही या वेतनापासून वंचित आहेत. वेळेत पगार न मिळाल्याने शिक्षकांनी उसनवारी करून दिवाळी साजरी केली. अगोदरच पालघर जिल्ह्यात नेहमीच पगाराला उशीर होत असल्याने शिक्षकांना दैनंदिन खर्च, मुलांचे शिक्षण, कर्जाचे हप्ते यांचे गणित बसवताना तारेवरची कसरत करावी लागते. दिवाळीत केलेल्या उसनवारीमुळे शिक्षकांचे आर्थिक गणित पूर्ण बिघडून गेले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी आहे.

यासंदर्भात पालघर जिल्हा शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष मनेश पाटील म्हणाले की, दरमहा एक तारखेला शिक्षकांचे वेतन अदा करण्याचे प्रा. शिक्षण संचालकांचे आदेश आहेत. हे वेतन एक तारखेला अदा न झाल्यास जबाबदार अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश आहेत. परंतु पालघर जिल्हा निर्माण झाल्यापासून आजपर्यंत कधीच एक तारखेला वेतन अदा करण्यात आलेले नाही.

आॅनलाइन पगार करण्याच्या कामामुळे शिक्षकांचे पगार करण्यास विलंब झाला आहे. आता यासंबंधातील प्रक्रिया पूर्ण झाली असून सीईओ साहेबांची सही झाली की एक - दोन दिवसात पगार होतील.
- लता सानप, प्राथमिक शिक्षणाधिकारी, पालघर जिल्हा

Web Title: Teachers in the district deprived of the October salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.