शिक्षकांनीच गणित केले हलकेफुलके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:00 AM2018-03-28T00:00:40+5:302018-03-28T00:00:40+5:30

ज्याप्रमाणे हाडाचा शिक्षक असतो त्याप्रमाणे हाडतुड करणारा शिक्षक असतो, हाडं खिळखिळी करणारा शिक्षकही असतो. शिक्षकाचे हे नवनवीन प्रकार विद्यार्थ्यांनी शोधून काढले आहेत

Teachers made math lightly | शिक्षकांनीच गणित केले हलकेफुलके

शिक्षकांनीच गणित केले हलकेफुलके

Next

ठाणे : ज्याप्रमाणे हाडाचा शिक्षक असतो त्याप्रमाणे हाडतुड करणारा शिक्षक असतो, हाडं खिळखिळी करणारा शिक्षकही असतो. शिक्षकाचे हे नवनवीन प्रकार विद्यार्थ्यांनी शोधून काढले आहेत. ‘अरे वा आता या सरांचा तास आहे’, अशी उत्साहवर्धक प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या मुखातून बाहेर पडते तशीच ‘अरे देवा, या सरांचा तास आहे’, असा निराशाजनक सूर विद्यार्थी लावतात. ‘आज आपण अवघड विषय शिकूया’, असे शिक्षकानेच म्हटल्यावर शिक्षकालाच जो विषय अवघड वाटतो त्याचा विचार विद्यार्थी सोडून देतात, अशा अनेक गमतीशीर किस्से आणि त्यावरील हास्यविनोदांनी चवथ्या जिल्हास्तरीय गणित अध्यापक कार्यशाळेचे वातावरण हलकेफुलके केले.
ठाणे जिल्हा गणित अध्यापक मंडळ व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने ही दोन दिवसीय कार्यशाळा टिपटॉप प्लाझा येथे आयोजित केली आहे. मंगळवारी कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी चार गणिततज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. आरमाईट इंजिनिअरिंग कॉलेजचे अध्यक्ष बोथ्रा यांनी ‘गणित शिक्षक व विद्यार्थी सुसंवाद साधूया’ या विषयावर मार्गदर्शन केले. हल्ली विद्यार्थ्याने गणित न सोडवता थेट उत्तर दिले तर शिक्षक त्याला चूक देतात, मात्र शिक्षकांकडे नसलेली पद्घत हल्लीच्या विद्यार्थ्यांकडे असते. ती नाकारू नका त्यांच्याकडून नवीन शिका. पुस्तकात अडकून न पडता मुलांना जास्त बोलते करा.
भारत हा विकसनशील देश आहे असे प्रत्येकजण आपल्या जन्मापासून ऐकतोय मात्र अद्याप भारत विकसित झालेला नाही. भारताला विकसित केवळ शिक्षकच करू शकतात. अखंड देश घडवण्याची ताकद शिक्षकांमध्ये आहे, असे मत बोथ्रा यांनी व्यक्त केले. दुपारच्या सत्रात गणिततज्ज्ञ व लेखक दिलीप गोटखिंडीकर यांनी ‘स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षेसाठी गणिताची तयारी’ या विषयावर संवाद साधला.
नुकत्याच झालेल्या गणित आॅलिंम्पियाडमध्ये भारताने वर्चस्व राखले. यावरून भारतीय गणित विषयाचे पक्के आहेत, हे लक्षात येते. गणित हा असा विषय आहे. ज्याच्या चाळणीतून काही गाळले असता शुद्ध गणितच बाहेर पडते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गणित शिकवायला जाताना पूर्वतयारीनिशी जावे आणि अध्ययनातून चांगले गणिततज्ज्ञ घडवावे, असे मत गोटखिंडीकर यांनी व्यक्त केले.
प्रसिद्ध गणिततज्ज्ञ रवींद्र येवले यांनी ‘हसतखेळत गणित शिकवूया’ या विषयावर हसतखेळत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसमोर जाताना चेहरा हसरा ठेवावा आणि तसेच ताण वाटणार नाही असे अध्ययन कराल तेव्हा गणित सोपं होईल. मूळात जे शिक्षक विद्यार्थ्यांच्या आवडीचे असतात त्यांचा विषयही विद्यार्थ्यांच्या आवडीचा असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आवडीचे बनण्याचा प्रयत्न करा आणि अवघड गणित सोपं करून सांगा. संस्कृतमधील गीता ज्ञानेश्वरी माऊलींनी मराठीत भाषांतर करून सामान्यांना कळेल अशा भाषेत आणली. त्यामुळे आपलं बोलणं सामान्य विद्यार्थ्याला कळलं पाहिजे याकडे लक्ष द्या.
एखादी संकल्पना विद्यार्थ्याला कळली म्हणजे सगळ्यांना कळली असे नसते. प्रत्येक बाकावरचा प्रत्येक विद्यार्थी हा वेगळाच असतो, हे लक्षात घेऊन शिकविताना विविधता ठेवा, असे मत येवले यांनी व्यक्त केले.

Web Title: Teachers made math lightly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.