शहापूरच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांचे ‘एनएमएमएस’ शिष्यवृत्ती मिशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:40 AM2021-09-13T04:40:10+5:302021-09-13T04:40:10+5:30
ठाणे : केंद्र शासनाच्या एमएचआरडी मंत्रालयाचा उपक्रम असलेली आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता आठवीच्या वर्गातील आर्थिक ...
ठाणे : केंद्र शासनाच्या एमएचआरडी मंत्रालयाचा उपक्रम असलेली आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता आठवीच्या वर्गातील आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती परीक्षा (एनएमएमएस) अत्यंत महत्त्वाची आहे. या शिष्यवृत्तीचा शहापूर तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी तालुक्यातील सर्व शिक्षक एकत्र येऊन त्यांनी एनएमएमएस हे शिष्यवृत्ती मिशन म्हणून हाती घेतली आहे. यासाठी गुरुवारी बैठकही पार पडली आहे.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा ही आठवीच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी परीक्षा आहे. जे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होऊन गुणवत्ता यादीत झळकतात, त्यांना पुढील चार वर्षे दरवर्षी १२ हजार रुपयेप्रमाणे एकूण ४८ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळत असते. या रकमेवर त्यांचे पुढील शिक्षण पूर्ण होऊ शकते. अशा या शिष्यवृत्ती परीक्षेत शहापूर तालुक्यातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रविष्ठ करून त्यांना यथायोग्य मार्गदर्शन करण्याचे मिशन या तालुक्यातील शिक्षकांनी हाती घेतले आहे. शहापूर तालुका मुख्याध्यापक संघ आणि शहापूर तालुका नॉलेज ॲकॅडमीने तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक आणि आठवीचे वर्ग असलेल्या प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांचे चिंतन शिबिर गुरुवारी म.ना. बरोरा विद्यालयात आयोजित केले होते. त्यात या शिक्षकांनी एकमत करून शिष्यवृत्ती मिशन हाती घेतले. वरिष्ठ शिक्षक दत्ता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या शिबिरात शेलवली बांगर शाळेचे सहशिक्षक सुधाकर पाटील आणि डॉ. हरिश्चंद्र भोईर यांनी उपस्थित शिक्षकांना या परीक्षेविषयी मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी दत्तात्रेय किरपण, विजय पडवळ, गुजरे यांच्यासह आर.के. पाटील, गणेश तळेले, चिंतामण वेखंडे, भगवान देसले, बाळू वेखंडे, रामराव खैरे आदी शिक्षक, मुख्याध्यापक उपस्थित होते.