शिक्षकांनी दिले सर्वांगीण विकास साधणारे शिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 02:37 AM2020-09-05T02:37:03+5:302020-09-05T02:37:48+5:30
गावात असलेल्या शाळेत गावातलीच मुलं, शिक्षक असायचे. त्यामुळे आपली नाती, समाज यांच्याशी चांगले ऋणानुबंध तयार झाले होते. शिक्षणासाठी आवश्यक असणारी चांगली इको सिस्टीम तिथे होती.
- स्नेहा पावसकर
ठाणे : चांगले गुण मिळवणं, हे आज प्रत्येकाचं ध्येय आहे, पण त्याचसोबत कुतूहल वाढवणारं आणि सर्वांगीण विकास करणारं शिक्षण मिळणं गरजेचं आहे. आमच्या शिक्षकांनी अशाच प्रकारचे शिक्षण दिले. आम्ही जे घडलो, त्यात शिक्षकांचे सर्वाधिक योगदान आहे, असे मत व्यक्त केले आहे, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञडॉ. अनिल काकोडकर यांनी.
गावात असलेल्या शाळेत गावातलीच मुलं, शिक्षक असायचे. त्यामुळे आपली नाती, समाज यांच्याशी चांगले ऋणानुबंध तयार झाले होते. शिक्षणासाठी आवश्यक असणारी चांगली इको सिस्टीम तिथे होती. - डॉ़ अनिल काकोडकर
शालेय शिक्षणातही
आईच माझी पहिली गुरू
मध्य प्रदेशातील खरबोन या लहानशा गावात माझे प्राथमिक शिक्षण झाले. मध्य प्रदेशात सर्वत्र हिंदी शाळा होत्या. परंतु, आम्ही राहत होतो, त्या गावात साधारण २०० मराठी कुटुंबं राहत होती. माझ्या आईने माँटेसरी स्कूलचा कोर्स केलेला होता. त्या गावात आईने मराठी माध्यमाची माँटेसरी सुरू केली. त्यामुळे शालेय शिक्षणातही माझी आई हीच माझी पहिली गुरू ठरली.
शिक्षकांनीच सांगितलं, पुन्हा ट्युशनचं नाव काढू नकोस
मी साधारण आठवी-नववीला होतो. अभ्यासात मी हुशार होतोच, पण दहावीला चांगले गुण मिळावे, या हेतूने आईने मला ट्युशनला जाण्यास सुचवले. आमच्या शाळेतीलच काही शिक्षक गरीब विद्यार्थ्यांचे ट्युशन घेत असत. मीही बुद्धिवंत सरांकडे ट्युशनसाठी गेलो. पहिल्याच दिवशी त्यांनी मला, ‘तू इथे का आलास?’ असे विचारले.
‘ट्युशन या पास होण्याची खात्री नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी असतात. तू तर हुशार आहेस, फक्त मेहनत कर. काही अडचण असेल तर मला कधीही, कुठेही शंका विचार, पण पुन्हा ट्युशनचं नाव नको काढूस’, असं सांगितलं. शिक्षण हा तेव्हा धंदा नव्हता, हे नक्की.
मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांतून झाले शिक्षण
प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेत झाले. मात्र, गावाबाहेर पडले की, हिंदीच भाषा वापरली जायची. त्यामुळे माध्यमिक शिक्षण हिंदी माध्यमाच्या शाळेत झाले, तेव्हा भाषेची अडचण वाटली नाही. तर, हिंदी माध्यमात शिकताना पुस्तकात इंग्रजी परिभाषा म्हणून दिलेली असे. त्यामुळे महाविद्यालयात इंग्रजीतून शिक्षण घेतानाही भाषेचा अडसर आला नाही. तिन्ही भाषांतून माझे शिक्षण झाले आणि मी त्या भाषांसोबत नेहमी कम्फर्टेबल होतो.
सरांचं ‘ते’ वाक्य स्मरणात राहिलं
मी इंजिनीअरिंगला प्रवेश घेतल्यावर पहिल्याच वर्गात सर आले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत, इंजिनीअरिंगमध्ये नॉलेज इज टेन (१०) पर्सेंट अॅण्ड नाइंटी (९०) पर्सेंट कॉमनसेन्स आहे, असे सांगितले. त्यांचे हे वाक्य कायम स्मरणात राहिले. शैक्षणिक प्रवासासह खऱ्या आयुष्यातही ते लागू पडते.