शिक्षकांचे वेतन मूळ बँकेतच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 03:24 AM2017-08-18T03:24:17+5:302017-08-18T03:24:20+5:30
शिक्षकांचे वेतन सणासुदीसाठी मूळ बँकेत करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे.
सुरेश लोखंडे ।
ठाणे : शिक्षकांचे वेतन सणासुदीसाठी मूळ बँकेत करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. यामुळे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेत ठाणे, पालघर जिल्ह्यांतील शिक्षकांचे वेतन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गणेशोत्सवासारखा सणासुदीचा काळ लक्षात घेऊन शिक्षकांचे वेतन २३ आॅगस्टला म्हणजे एक आठवडा आधीच करणार असल्याचे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले.
टीडीसीसी बँकेऐवजी शिक्षकांचे वेतन टीजेएसबी बँकेत वळवण्याच्या शासन निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावरील सुनावणी सोमवारी झाली. सणासुदीच्या काळात शिक्षकांचे वेतन रखडणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना न्यायालयाने देऊन या काळात मूळ बँकेतच शिक्षकांचे वेतन त्वरित करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे २० हजार ४९६ शिक्षकांचे वेतन २३ आॅगस्टला करण्याच्या निर्णयास बँकेचे उपाध्यक्ष भाऊ कुºहाडेंसह बँकेच्या सर्व संचालकांनी एकमताने घेतल्याचे पाटील यांनी सांगितले.
उच्च न्यायालयात या याचिकेवरील शेवटची सुनावणी सप्टेंबरअखेर होणार असून तो निर्णयही टीडीसीसीच्या बाजूने लागेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. मात्र, सध्या तरी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक एक हजार २१८ शाळांमधील २० हजार ४९६ शिक्षक टीडीसीसी बँकेचे खातेदार आहेत.
त्यांना गणेशोत्सवासाठी सुमारे ७५ कोटी रुपयांचे वेतन आधीच देण्याचा निर्णय घेऊन टीडीसीसीने टीजेएसबीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. आॅगस्ट महिन्यापासून शिक्षकांचे पूर्ण वेतन टीजेएसबीतून होणार होते. परंतु, सणासुदीच्या कालावधीत शिक्षकांचे वेतन मूळ बँकेतून करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने टीजेएसबीतून होणारे वेतन सध्या तरी रखडले आहे.
आजमितीस टीडीसीसी बँकेत जिल्ह्यातील ४३२ प्राथमिक, तर ४८६ माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक १२१८ शाळांमधील शिक्षकांच्या ९९६ कोटी ५६ लाखांच्या ठेवी आहेत. त्यांना टीडीसीसीने ५३१ कोटी ६३ लाखांचे कर्जवाटप केले आहे. यामध्ये २५ कोटी १२ लाखांचे गृहकर्ज, आठ कोटी ९६ लाखांचे शैक्षणिक व अन्यही स्वरूपांचे कर्ज दिले आहे.
>पुढील सुनावणीकडे लागले लक्ष
आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या टीडीसीसी बँकेचे नोटाबंदीच्या काळातही वर्किंग कॅपिटल सात हजार ३१३ कोटींचे होते. बँकेत सहा हजार १८ कोटींच्या ठेवी असून अन्य ठेवीदेखील २७ कोटी ९६ लाखांच्या आहेत. यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या या बँकेने शिक्षकांचे शासनाकडून वेतन येण्याआधीच ७५ कोटींचे वेतन देण्याचा निर्णय घेऊन शिक्षकांना सुखद धक्का दिला आहे. मात्र, सप्टेंबरमध्ये होणाºया न्यायालयीन सुनावणीत काय आदेश होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.